
>> विलास पंढरी
‘सीडीएस’ पदाची निर्मिती नव्यानेच झाली असल्याने या संरचनेत लष्करप्रमुखपदाची जबाबदारी नरवणे यांना पार पाडावयाची आहे. गेल्या 38 वर्षांपासून ते लष्करी सेवेत आहेत. या प्रदीर्घ काळात पार पाडलेल्या जबाबदाऱया आणि अनुभव यांच्या जोरावर ही धुरा ते समर्थपणे सांभाळतील. सध्या प्रत्येकच क्षेत्रात जटिल प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या संरक्षण क्षेत्रात तर धर्मांध पाकिस्तान आणि विस्तारवादी चीनमुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने एक अत्यंत अभिमानस्पद अशी घटना 1752 मध्ये घडली. पुण्याच्या राघोबादादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तिथे रोवला. घटना मराठय़ांच्या शौर्याचे प्रतीक असलेली ही घटना म्हणूनच तमाम मराठी भाषकांना अभिमान वाटावा अशी आहे. या पराक्रमावरूच ‘अटकेपार झेंडा लावणे’ ही म्हण प्रचलित झाली. काळ बदलला असल्याने कर्तृत्वाचे संदर्भ बदलतात. 2019 सरता सरता मराठी माणसाचे उत्तुंग कर्तृत्व दाखवणाऱया अशाच दोन घटना घडल्या आहेत. यापूर्वी सरसेनापतीपदावर जनरल अरुणकुमार वैद्य, तर न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीशपदावर विराजमान होणाऱया पहिल्या मराठमोळ्या व्यक्ती होत्या. आता दुधात साखर म्हटल्याप्रमाणे 18 नोव्हेंबरला नागपूरचे न्या. शरद बोबडे देशाचे सरन्यायाधीश झाले. आता जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देशाचे 28वे लष्करप्रमुख झाले आहेत.
सध्या हिंदुस्थानी लष्कराचे उपप्रमुख असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे लष्करप्रमुखपदाची सूत्रे आली आहेत. दिवंगत जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर अनेक दशकांनी झालेले ते मराठी लष्करप्रमुख असतील. मूळचे पुण्यातील असलेले मनोज नरवणे यांना सवादोन वर्षे प्रमुख म्हणून लष्कराची धुरा सांभाळण्याची संधी मिळणार आहे. देशातील व सीमेवरील परिस्थिती बघता हा काळ निश्चितच त्यांच्यासाठी संधी, कर्तबगारी आणि आव्हानांचाही असणार आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत 31 डिसेंबरला निवृत्त झाले. विद्यमान सरकारने नवीनच तयार केलेल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ या पदावर सरकार रावत यांचीच नियुक्ती केली आहे. ‘सीडीएस’ पदाची निर्मिती नव्यानेच झाली असल्याने या संरचनेत लष्करप्रमुखपदाची जबाबदारी नरवणे यांना पार पाडावयाची आहे. गेल्या 38 वर्षांपासून ते लष्करी सेवेत आहेत. या प्रदीर्घ काळात पार पाडलेल्या जबाबदाऱया आणि अनुभव यांच्या जोरावर ही धुरा ते समर्थपणे सांभाळतील.
सध्या प्रत्येकच क्षेत्रात जटिल प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या संरक्षण क्षेत्रात तर धर्मांध पाकिस्तान आणि विस्तारवादी चीनमुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. सरकारच्या उत्पन्नात घट होत असताना लष्कराच्या निधीत वाढ करून घेण्यापासून शस्त्रास्त्रs आणि उपकरणांच्या आधुनिकीकरणापर्यंत आणि लष्कराच्या सुधारणांपासून कार्यक्षमतेपर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. सध्या संरक्षण दलांसाठी सवाचार लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद असून त्यामध्ये वाढच झालेली आहे. देशात सध्या असलेले मंदीचे वातावरण पाहता येत्या अर्थसंकल्पात या निधीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता मात्र नाही. तसेच उपलब्ध निधीतील मोठा वाटा दैनंदिन खर्च आणि देखभाल यांच्यावरच जातो. माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्याने त्यांचा वापर शत्रूंकडून वाढतो आहे. संरक्षण सज्जतेत त्यावर भर देतानाच पारंपरिक सज्जतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यावरील भरही वाढवावा लागणार आहे. लढाऊ विमाने व बोटी, हेलिकॉप्टर, रणगाडे, क्षेपणास्त्रs यांपासून ते विविध शस्त्रास्त्रांपर्यंतच्या साधनांना अत्याधुनिक बनवणे आणि अधिक नेमकेपणाने लक्ष्यभेद करण्यासाठी अधिक सक्षम बनवण्याची गरज कायमच असते. त्यासाठी आधुनिकीकरण हाच एकमेव मार्ग आहे. या निरंतर प्रक्रियेला गतिमान करण्याचे आव्हान लेफ्टनंट जनरल नरवणे यांच्यासमोर असणार आहे. आतापर्यंतच्या सर्व जबाबदाऱया समर्थपणे पार पाडणारे नरवणे नवीन आव्हानांना आश्वासकपणे सामोरे जातील आणि महाराष्ट्राची मान उंचावतील यात शंकाच नाही.
मनोज नरवणे हे हिंदुस्थानी लष्कराचे 28 वे प्रमुख होतील. चीनच्या सैन्यदलानंतर जगातील दुसऱया सर्वात मोठय़ा सैन्यदलाचे नरवणे मुख्य असतील. ते हिंदुस्थानी सैन्यात 7 जून 1980 ला सेकंड लेफ्टनंट म्हणून दाखल झाले. 7 जून 1982 ला लेफ्टनंट झाले तर 7 जून 1985 ला कॅप्टन झाले. मेजर या पदावर त्यांना 7 जून 1995 ला पदोन्नती मिळाली ते 31 डिसेंबर 2002 ला लेफ्टनंट कर्नल झाले. तर 1 फेब्रुवारी 2005 रोजी कर्नल झाले. ब्रिगेडियर या पदाची जबाबदारी त्यांना 19 जुलै 2010 रोजी देण्यात आली. त्यांनी मेजर जनरल या पदाचा कार्यभार 1 जानेवारी 2013 रोजी स्वीकारला. ते जेव्हा 10 नोव्हेंबर 2015 ला लेफ्टनंट जनरल म्हणजेच उपसेनाधिकारी झाले तेव्हाच लष्करप्रमुख होणार हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणे 17 डिसेंबर 2019 ला जनरल म्हणजेच लष्करप्रमुख म्हणून सरकारने त्यांच्या नावाची घोषणा केली. संरक्षण क्षेत्राचा वारसा नरवणेंना वडिलांकडूनच मिळाला आहे. त्यांचे वडील मुकुंद नरवणे हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत.
नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झालं आहे महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 7 जून शीख 1980 रोजी ‘लाइट इन्फंट्री’मधून लष्करात रुजू झाले. लष्करातील आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी आसाम रायफल्सचे महानिरीक्षक, जम्मू आणि कश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख, आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महूस्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक व कोलकातास्थित पूर्व मुख्यालय प्रमुख अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यानंतर त्यांना लष्कराच्या उपप्रमुखपदी नेमण्यात आले. युद्ध, शांतताकालीन आणि दहशतवादी कारवायांनी धुमसणाऱया अशा तिन्ही प्रकारच्या क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव नरवणेंना आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले कौशल्य आणि वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यांच्या या कामगिरीची वेळोवेळी दखल घेत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुण्यात असूनही सैन्यदलाला अधिकारी पुरवणाऱया या जगप्रसिद्ध संस्थेत मराठी टक्का अंमळ कमीच आहे. या संस्थेचा विद्यार्थी आता सर्वोच्च पदावर पोचल्याने मराठी तरुणांना प्रोत्साहन मिळून हा टक्का नक्कीच वाढेल अशी अपेक्षा आहे.
























































