
बेटी बचाओ,बेटी पढाओ’ या राष्ट्रीय उपक्रमातंर्गत जिल्हा रुग्णालय प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या पुढाकारातून रविवारी सकाळी 11 तब्बल 836 मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. दरम्यान स्त्री जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून बीडची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख झाली असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी करत खटोड प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतूक केले. या उपक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, ‘वंडर बुक रेकॉर्ड’च्या भारतातील हैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व संत प्रतिमांचे पूजन करुन नामकरण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्याची खासदार म्हणून नाही तर तुमची बहिण म्हणून मी इथे आले आहे, असे प्रतिपादन खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी केले. तसेच “बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रुण हत्येचा बदनामीचा डाग धूवून काढण्यापासून ते स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून आता बीडची ओळख झाली आहे. यासाठी खटोड सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकारही महत्वाचा ठरत आहे. 301 मुलींपासून आता 836 मुलींचे सामुहिक नामकरण खटोड प्रतिष्ठानने करुन एक विक्रम प्रस्थापित केला आहे.” असे मुंडे म्हणाल्या. तसेच मुलींची आत्या नव्हे तर मुलींची मावशी म्हणून सातत्याने यायला आवडेल असेही मुंडे म्हणाल्या.
गोल्डन बुक व वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
कीर्तन महोत्सवातील या सामुहिक नामकरण सोहळ्याची ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या लंडन स्थित आंतरराष्ट्रीय संस्थेसह गोल्डन बुक ऑफ रेकार्ड या संस्थेने नोंद घेतली. ‘वंडर बुक रेकॉर्ड’चे भारतातील हैद्राबाद येथील समन्वयक डॉ. स्वर्ण श्री गुराम यांनी या नामकरण सोहळ्याचे निरीक्षण केले. आशिया खंडात असा उपक्रम राबवणार्या स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानची यंदा तिसर्यांदा आंतरराष्ट्रीय विक्रमात नोंद झाली आहे.




























































