
‘ग्रीन थिएटर’च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन, इको-फॉक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाउंडेशन मालवण या तीन संस्थांनी पुढाकार घेतला आहे. माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता व्हावी, यासाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रविवार 19 जानेवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हास्तरीय माध्यमिक आंतरशालेय पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पवार यांनी दिली.
मालवण येथील हॉटेल चिवला येथे ‘ग्रीन थिएटर’वर आधारित पत्रकार परिषद झाली. यावेळी उपाध्यक्ष गौरव ओरसकर, महेश काळसेकर, रुपेश नेवगी, मुकेश बांवकर, सुनील परुळेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील जिल्ह्यातील प्रथम येणार्या 12 शाळांना (पाचवी ते दहावी) प्राधान्य दिले जाणार आहे. बालनाट्यासाठी कांदळवन संवर्धन व उपयुक्तता हा विषय ठेवण्यात आला आहे.
पवार म्हणाले, पर्यावरण जनजागृतीसाठी चर्चासत्रांपेक्षा नाटक हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आधारित विषय घेऊन नाट्यरसिक व समाजासमोर येण्यासाठी मँग्रोव्ह फाउंडेशन, इको-फोक्स व्हेंचर्स आणि येथील स्वराध्या फाउंडेशन संस्था प्रयत्नशील आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर आदी ठिकाणी होणारी ही स्पर्धा प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माध्यमिक शाळांच्या इच्छुक संघांनी आयोजकांना संहिता पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी 12 संघापेक्षा अधिक संघ आल्यास प्राथमिक फेरी घेतली जाईल.
आमचा पर्यावरण बालनाट्य महोत्सव घेण्यामागे पर्यावरण जागरूकता हा उद्देश आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना नाट्य चळवळीबरोबरच पर्यावरणाबाबत माहिती व्हावी, यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. नाटकाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचेल, असे गौरव ओरसकर, रुपेश नेवगी यांनी सांगितले.
प्रथम क्रमांकाला 10 हजाराचे बक्षीस
म्रॅग्रोव्ह फाउंडेशनच्या सहसंचालक निनू सोमराज, इको फोक्स व्हेंचर्सचे परेश पिंपळे, स्वराध्या फाउंडेशन पुढाकारातून आयोजित स्पर्धेतील विजेत्यांना तीन क्रमांकाना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार, 5 हजार, तर उत्तेजनार्थ तीन हजार रुपये, चषक व प्रमाणपत्र दिले जाईल. वैयक्तिक उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट लेखन व तांत्रिक अंगे यासाठी प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे 1 हजार 500, 1 हजार, पाचशे रुपये, चषक, प्रमाणपत्र, उत्कृष्ट अभिनय मुले-मुली चषक व प्रमाणपत्र दिले जाईल. इच्छुक शाळांनी आपली नावे 13 जानेवारीपर्यत गौरव ओरसकर-भरड मालवण यांच्याकडे पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रथमच उपक्रम
बालनाट्यात कोणत्याही वृक्षाचा, फांदीचा समावेश होता नये. शहराबाहेरील संघांना 500 रुपये तर तालुक्याबाहेरील संघांना 1 हजार रुपये प्रवासखर्च दिला जाणार आहे. बालनाट्यासाठी दहा ते जास्तीत जास्त 20 मिनीटांचा कालावधी दिला जाईल. सर्व बक्षिसांची रक्कम ही विजेत्या शाळांना धनादेशाद्वारे दिली जाईल. जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत असून दरवर्षी असा पर्यावरण महोत्सव घेण्याचा मानस असल्याचे पवार यांनी सांगितले.



























































