
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार 2019-20 या वर्षासाठी जिल्हयात नाफेडकरीता मार्केटींग फेडरेशनच्या सभासद संस्थामार्फत तूर खरेदी नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासनाने तूर खरेदीसाठी 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला असून 1 जानेवारी 2020 ते 14 फेब्रुवारी 2020 पर्यत नावनोंदणीची मुदत आहे.
राहुरी तालुक्यासाठी राहुरी तालुका खरेदी विक्री संघ लि, शेवगाव तालुक्यासाठी जगदंबा महिला ग्राहक सह.संस्था, जामखेड तालुक्यासाठी पुण्यश्लोक कृषी प्रक्रिया सह.संस्था, कर्जत तालुक्यासाठी कर्जत तालुका खरेदी विक्री संघ मिरजगाव, पाथर्डी तालुक्यासाठी जय भगवान स्वयंरोजगार सह.संस्था, नगर तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तर पारनेर तालुक्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शेतकर्यांनी तूर खरेदी नोंदणीसाठी सातबारा उतारा, चालू बँक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड या कागदपत्रांची असून नोंदणीत भरलेली सर्व माहिती योग्य असल्यास नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येईल. शेतकर्यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवून खरेदी केंद्रावर घेऊन यावा. माल खरेदी झाल्यानंतर त्वरीत ऑनलाईन काटा पट्टी घेण्यात यावी. या योजनेमध्ये केवळ ऑनलाईन काटा पट्टी ग्राह्य धरण्यात येईल. शेतमालाची रक्कम दिलेल्या बँक खाती ऑनलाईन पध्दतीने जमा होणार आहे. त्यामुळे बॅक खात्याची माहिती अचूक देण्यात यावी. अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते. जिल्हयातील सर्व शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नगर यांनी केले आहे.




























































