
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 89वा जयंती दिन म्हणजेच ममता दिन सोमवार, 6 जानेवारी रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या वतीने शिवतीर्थावर सुगम संगीत आणि भजन गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ममता दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याजवळ सकाळी 7 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. पहिल्या सत्रात श्री सिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, संजय परळकर, हर्षदा वेल्हाळ, मनीषा कीर, चंद्रकांत साखरपेकर, प्रमोद परकर, नितेश निळगुळवकर, सुहास जयवंत, विजय पवार, श्यामसुंदर परब आदी कलाकार भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर दिशा इव्हेंटच्या संचालिका दिशा पंडीत-धारावत या भक्तिगीते सादर करणार आहेत.
दुसऱया सत्रात आर्यादुर्गा भजन मंडळ, दादर, दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ, दादर, सावंतवाडी संस्थान महिला भजन मंडळ या संस्थांच्या वतीने भजन गीते सादर केली जाणार असल्याची माहिती स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीने दिली आहे. दरम्यान, माँसाहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खोपोली येथील ‘रमाधाम’ येथे भजन-कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम होईल, असे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी सांगितले.
























































