
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये पर्यावरण व पर्यटन ही माझ्या आवडीची दोन खाती मिळालेली आहेत. या दोन्ही विभागांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना देईन, अशी ग्वाही नवनिर्वाचित पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या खातेवाटपात माझ्या आवडीची खाती मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्यासोबत चांगली लोकं आहेत. त्यामुळे चांगले काम करता येईल असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व आमदार सोबत आहेत. सर्वांच्या सूचनेनुसार चांगले काम करता येईल. मित्रपक्षांकडूही चांगले सल्ले मिळतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या विभागात महाराष्ट्रासाठी चांगले काम करण्याची संधी आहे. या खात्यांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. भविष्यातील योजनांबाबत पुढील एक-दोन दिवसांत सांगेन असे त्यांनी स्पष्ट केले.


























































