
गाळप हंगाम सुरू होऊन महिन्याभराचा कालावधी उलटला असला तरी काही कारखान्यांनी ’एफआरपी’ची रक्कम ऊस उत्पादकांना दिलेली नाही. नगर जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी ’एफआरपी’ची संपूर्ण रक्कम दिली आहे. तर आठ कारखान्यांनी ’एफआरपी’ची 75 कोटी रुपये रक्कम थकवली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी गाळपासाठी ऊस आणला असला तरी एक रुपयाही अद्याप ऊस पुरवठा करणार्यांना दिलेला नाही. यंदा उसाची कमतरता असल्याने कारखाने ’एफआरपी’ थकविणार नाही, असे बोलले जात होते. प्रत्यक्षात यंदाही कारखान्यांकडे ’एफआरपी’ची रक्कम थकीत आहे.
उसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदा गाळपाला कमी ऊस उपलब्ध होत आहे. उसाच्या टंचाईमुळे कारखान्यांच्या गाळपावर त्याचा परिणाम होत आहे. जिल्ह्यात सहकारी व खासगी असे 23 कारखाने असून या हंगामात 13 कारखाने सुरू झाले आहेत. तर 10 कारखाने बंद आहेत. सहकारी व खासगी कारखान्यांनी आतापर्यंत 20 लाख 21 हजार टन उसाचे गाळप करून 18 लाख 31 हजार क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला असला तरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे 75 कोटी रुपयांचे देणे थकले आहे. ज्ञानेश्वर, विखे, थोरात हे तीन सहकारी व गंगामाई या खासगी अशा चार कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाची शंभर टक्के रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. तर संजीवनी, अंबालिका, क्रांती शुगर कारखान्यांनी ’एफआरपी’ची काही रक्कम दिलेली आहे. अंबालिका कारखान्याने 81 टक्के, संजीवनी कारखान्याने 33 टक्के, क्रांती शुगरने 81 टक्के ’एफआरपी’ची रक्कम दिली आहे. काही कारखान्यांनी एकरकमी ’एफआरपी’ देणे शक्य नसल्याचे सांगून एफआरपी रक्कम टप्प्याटप्प्यात देण्याचे सांगितले आहे.
आतापर्यंत सात साखर कारखान्यांनी 218 कोटी रुपयांची ’एफआरपी’ रक्कम दिली आहे. साखर विक्री करून कारखाने ’एफआरपी’ रक्कम देत आहेत. ऊस गाळपाला आल्यानंतर चौदा दिवसांनी शेतकर्यांना ’एफआरपी’ची रक्कम देण्याचा नियम आहे. परंतु, काही कारखाने हा नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे. महिन्यानंतरही ऊस उत्पादकांना पैसे दिले जात नाहीत. अगस्ती, अशोक, मुळा, संजीवनी, वृद्धेश्वर, अंबालिका, क्रांती शुगर या कारखान्यांकडे ऊस उत्पादकांची 75 कोटींची थकबाकी आहे. या कारखान्यांचे गाळप सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. त्यानंतरही डिसेंबर अखेरपर्यंत या कारखान्यांनी एफआरपी रक्कम दिलेली नाही. याबाबतचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयाला देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत हे कारखाने एफआरपीची रक्कम देतील, अशी माहिती नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
‘एफआरपी’ प्रमाणेच रक्कम
उसाची कमतरता असल्यास साखर कारखान्यांमध्ये ऊस दर देण्यासाठी स्पर्धा लागते. यंदा मात्र साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्यामुळे ऊस कमी असून, दर देण्यास स्पर्धा लागलेली नाही. केवळ गंगामाई कारखान्याने टनाला अडीच हजार रुपये भाव दिला आहे. या कारखान्याची ’एफआरपी’ची रक्कम टनाला 2 हजार 378 आहे. इतर कारखान्यांनी ’एफआरपी’प्रमाणेच पहिला हप्ता दिला आहे.
साखर कारखान्यांकडे थकीत एफआरपी
कारखाना थकीत एफआरपी
- अगस्ती 17 कोटी 3 लाख
- अशोक 11 कोटी 74 लाख
- मुळा 11 कोटी 64 लाख
- संजीवनी 10 कोटी 15 लाख
- अंबालिका 14 कोटी 23 लाख
- वृद्धेश्वर 6 कोटी 64 लाख
- युटेक शुगर 1 कोटी 13 लाख




























































