
वाहनचालकांना शिस्त लागावी आणि वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून बेकायदा पार्किग करणाऱ्यावर लावण्यात आलेला 5 हजार ते 23,500 पर्यंतचा दंड आता कमी होणार आहे. प्रशासनाने सुधारित दर जाहीर केले असून पार्किग दराच्या 40 पट तर वर्दळीच्या मार्गांवर 80 पट दंड आकारला जाणार आहे. सध्या पार्किग दर 40 ते 100 रुपये असून नव्या दरपत्रकानुसार दंड किमान 1800 रुपये होणार आहे.
- दुचाकी– आधीचा दंड 5 हजार, सुधारित दंड 1800
- तीन-चार चाकी – आधीचा दर 10 हजार, सुधारित दंड 4 हजार
- ऑटो, टॅक्सी- आधीचा दर 8 हजार , सुधारित दर 4 हजार
- सार्वजनिक वाहतूक बस- आधीचा दर 7 हजार होता आणि तोच कायम ठेवण्यात आला आहे
- अवजड वाहने, ट्रॅक- आधीचा दर 15 हजार, सुधारित दर 10 हजार
मुंबईत बेकायदा पार्किगमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. यामुळे बेकायदा पार्किंग करणार्यांवर 5 ते 23 हजारांपर्यंत दंड आकारण्यात येत होता. पालिकेच्या पार्किंग वाहनतळापासून 500 मीटरच्या आत पार्किग केल्यास हा दंड वसूल केला जात आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी ही मोठी रक्कम असल्याने वाहनचालक आणि पालिका कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे सुधारित परिपत्रक जाहीर केले आहे. वाहनतळ उपलब्ध असूनही तळापासून 500 मीटरच्या आत पार्किंग केल्यास आता चाळीस पट दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम कमी केल्यास वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, वर्दळीचे मार्ग असलेल्या एम. के. रोड, एस. व्ही. रोड, एल. बी. एस. मार्ग, न्यु लिंक रोड या चार महत्त्वाच्या रस्त्यांसाठी बेकायदा पार्किगसाठी 80 पट दंड आकारला जाणार आहे.
नगरसेवकांनी दर कमी करण्याचे पत्र दिले होते. मुंबईकरांना नाहक भूर्दंड सहन करावा लागत होता. सुधारित दरांबाबतही पाहणी केली जाईल. पार्किग पॉलिसीमुळे मुंबईकरांना कोणताही त्रास होता कामा नये- यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष



























































