अमित शहा यांना विरोध करण्यासाठी 35 कि.मी.ची मानवी भिंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 15 जानेवारी रोजी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी त्यांना नागरिकांच्या मोठय़ा विरोधाला सामोरे जावे लागेल. केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीगने अमित शहा यांना विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांच्या मदतीने काळी भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ कोझिकोड येथे काढण्यात येणाऱ्या रॅलीमध्ये अमित शहा सहभागी होणार आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगने यावेळी त्यांचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युवा ब्रिगेडचे सदस्य कालिकत विमानतळ ते वेस्टहिल हेलिपॅडदरम्यान असलेल्या 35 किलोमीटरच्या रस्त्यावर दुपारी 3 ते 4 या कालावधीत मानवी साखळी उभारणार आहेत. तसेच यावेळी सर्व सदस्य काळ्या कपडय़ामध्ये त्यांचा निषेध करणार आहेत.  शहा हे करीपपूर विमानतळावर उतरतील आणि रॅलीच्या ठिकाणापर्यंतचा 35 किलोमीटरचा प्रवास हेलिकॉप्टरने करणार आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीगने यापूर्वी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.