
>> वैश्विक, [email protected]
नवं वर्ष हिंदुस्थानच्या अवकाश कार्यक्रमासाठी नव्या आशेची नवी उभारी घेऊन आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर, जिथे आजवर कोणी पोचलं नव्हतं तिथे ‘विक्रम’ अवतरक (लँडर) उतरवून त्यातील ‘प्रज्ञान’ चांद्रवाहन चालवण्याची महत्त्वाकांक्षी योजना गतवर्षी अगदी काही क्षणांनी फसली. लाखो डोळे त्या यशस्वी घटनेची नोंद मनात करण्यासाठी टीव्हीकडे लागले होते. त्यात देशातली जनता तर होतीच, पण जगभरचे वैज्ञानिकही होते. मात्र ऐनवेळी अवतरकाचा कोन (अँगल) किंचित चुकल्याने सारी गडबड झाली. ‘किंचित’ कोन चुकला तरी अनर्थ होण्याच्या गोष्टी अशा महत्त्वाच्या प्रकल्पात घडू शकतात हे ठाऊक असूनही अपयशाने वाईट वाटतंच. तसंच ते सर्व देशवासीयांना वाटलं. ‘इस्रो’चे प्रमुख के. शिवन तर अत्यंत भावुक झाले.
मात्र अशा अपयशाने वैज्ञानिक कधीच खचून जात नाहीत. अपयशातूनही अनेक गोष्टी शिकता येतात असं ते मानतात. विजेच्या बल्बचा शोध लावणाऱया थॉमस अल्वा एडिसनला बल्बमधील ‘टँग्स्टन’ची तार (फिलॅमेन्ट) सापडेपर्यंत अनेकदा अपयश आलं. प्रत्येक वेळी अन्य धातूची तार पटकन जळून बल्ब निकामी व्हायचा. त्या वेळी त्याला कोणीतरी म्हटलं ‘बऱयाच चिकाटीने प्रयत्न करतोयस, पण अपयश येतंय.’ त्यावर तो जे म्हणाला ते महत्त्वाचं, ‘तसं नव्हे कोणत्या मार्गाने जायचं नाही ते मला प्रत्येक प्रयोगातून कळतंय!’
त्याच्या अशा अंतर्मनातल्या ऊर्जेनेच विजेचा दिवा उजळला. तशीच अदम्य वृत्ती खरं तर सर्व क्षेत्रांमधल्या माणसांमध्ये हवी. वैज्ञानिकांकडून विज्ञान तर शिकावंच, पण त्यामागची चिकाटी आणि प्रयत्नवादही अंगिकारावा. तो खरा वैज्ञानिक दृष्टिकोन. तर मुद्दा आपल्या चांद्रयानाचा. पहिलं कमालीचं यशस्वी झालं म्हणून आपण दुसऱया वेळी आत्मविश्वासाने काहीसे निश्चिंत होतो. मात्र तेव्हा आलेलं अपयश हेसुद्धा अशा मोहिमांमधील ‘शिक्षणा’चाच एक टप्पा असतो.
तेच ध्यानात ठेवून ‘इस्रो’ने पुन्हा नवी योजना जाहीर केले. ‘आदित्य’ हे आपलं सूर्ययान सूर्याचा वेध घेणारच आहे. त्याचबरोबर जवळच्या चंद्राकडेही दुर्लक्ष न करता चांद्रयान-3 ही मोहीम पुढच्या वर्षी कार्यान्वित होईल. या मोहिमेची माहिती आठवडय़ाभरापूर्वी शिवन यांनी सविस्तरपणे दिली. या मोहिमेतही लँडर (अवतरक), रोव्हर (चंद्रावर फिरणारे वाहन) यांचा समावेश आहे. त्यासाठी लागणारं पुरेसं इंधन अर्थातच यानात असेल. चांद्रयान – 2 चांद्रपृष्ठावर उतरता उतरता समतोल न साधल्याने कोसळले ही गोष्ट लक्षात घेऊन यावेळच्या यानात आवश्यक ते बदल केले जातील. ते यशस्वी व्हावेत अशी सदिच्छा सारेच व्यक्त करतील.
त्याचबरोबर आपल्या अवकाश संशोधन केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो हिंदुस्थानी व्यक्ती, हिंदुस्थानी अवकाशयानातून, अवकाशात पाठवण्याचा. ही व्यक्ती कोणीही असू शकेल. कारण या ‘गगनयान’ नावाच्या मोहिमेसाठी हवाई दलातल्या चार जणांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याची बातमी आहे. ही मोहीम यशस्वी झाली की हिंदुस्थानी यानातून पहिला, परंतु कालक्रमात दुसरा हिंदुस्थानी अंतराळवीर अंतराळात जाईल.
इथे आठवण आली ती 1984 मध्ये रशियन अंतराळातून अवकाशात गेलेल्या राकेश शर्मा यांची. त्या वेळीही रवीश मल्होत्रा आणि राकेश शर्मा यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. राकेशची निवड होऊन तो अंतराळात गेल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याच्याशी संपर्क साधून ‘आपल्याला अंतराळातून हिंदुस्थान कसा दिसतो?’ असा प्रश्न विचारला आणि राकेश क्षणात उत्तरला ‘सारे जहां से अच्छा!’ या घटनेचं थेट व्हिडीओ चित्रण त्या वेळी टीव्हीवर पाहता आलं होतं. अमेरिकेचे पहिले चांद्रवीर हिंदुस्थानात आले तेव्हा त्याना पाहण्याचा योग आला होता. राकेश शर्माचा सत्कार तर मुंबईत राज कपूर यांच्या उपस्थितीत झाला. तिथे पत्रकार म्हणून काही क्षण राकेशना भेटता आलं. वेगळाच अनुभव होता. आता आपल्या ‘गगनयान’मधून आपला माणूस अंतराळयात्रा करेल ही अधिक अभिमानाची गोष्ट. या मोहिमेच्या संभाव्य अंतराळयात्रींचं प्रशिक्षणही रशियातच होणार आहे. अशा वैश्विक प्रकल्पात आता सारे देश परस्परांशी सहकार्य करताहेत ही चांगली गोष्ट. माणसांचे पृथ्वीवरचे हेवेदावे नि वादविवाद अंतराळात न्यायचे कारण नाही. ‘गगनयान’ आणि चांद्रयान – 3 च्या यशाने आपल्या नव्या पिढीला अधिक उत्साह येईल. स्वकर्तृत्वाचं मोल आत्मबल देणारं असतंच. ‘इस्रो’ला त्यात भरपूर यश प्राप्त होवो!
























































