
जेएनयू विद्यापीठाच्या निषेधार्थ मुंबईत तरुणांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. मुंबईतल्या युवा वर्गाने गेट वे ऑफ इंडिया येथे जमून शांततेत आंदोलन केले. विरोध प्रदर्शित करण्याचे हे उत्तम उदाहरण असून तरुणांच्या या कृतीतून इतर आंदोलक व ज्येष्ठ व्यक्तींनी बोध घेतला पाहिजे. शांततेत निदर्शने करून आपल्या आवाजातील ताकद कशी वाढवता येते हेच तरुणाई दाखवून देत आहे, अशा शब्दांत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
दादरमधील शिवाजी पार्क हा परिसर सायलेन्स झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे. 2010 साली तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान म्हणून जाहीर करण्यात यावे तसेच या मैदानावर इतर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावरील शपथविधी सोहळा हा नियमबाह्य असल्याचा आरोप करत वीकॉम ट्रस्ट या संस्थेच्या वतीने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला केलेल्या विरोधावरून हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापत खडे बोल सुनावले तसेच या विरोधाबाबत नाराजी व्यक्त करत मुंबईत तरुणांनी शांततेत केलेल्या आंदोलनाची आठवण याचिकाकर्त्यांना करून दिली.
शिवाजी पार्कचा ताबा असलेल्या पालिका प्रशासनाने या सोहळ्याला रीतसर परवानगी दिलेली असताना केवळ सरकारी कार्यक्रमांना विरोध करण्याची याचिकाकर्त्यांची ही पद्धत योग्य नाही असे हायकोर्टाने फटकारले व याचिकाकर्त्यांना याप्रकरणी कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिका अर्ज निकाली काढला.
आम्ही काही वॉचमन नाही!
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोध करत निरर्थक याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा सुनावणी वेळी हायकोर्टाने चांगलाच समाचार घेतला. पालिकेच्या ताब्यात असलेल्या शिवाजी पार्कवर सरकारी परवानगीनुसार जर कार्यक्रम होत असतील तर हायकोर्टाने त्यात का हस्तक्षेप करायचा? कोर्टाने दर वेळी वॉचमनसारखी भूमिका निभवायची असे लोकांना अपेक्षित नाही, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांवर ताशेरे ओढले.




























































