
बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने मंगळवारी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीबाहेर सुरू असलेल्या आंदोलनात हजेरी लावून विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी दीपिकाने कोणतेही भाषण केले नाही. तिने शांतपणे विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आणि ती निघून गेली. दीपिकाची ही जेएनयू भेट चांगलीच गाजत आहे. तिच्यावर कौतुक आणि टीकेचा एकाचवेळी भडिमार होत आहे. तिला ‘ब्रेव्ह गर्ल’ ठरवले जात असताना ‘बॉयकॉट छपाक’ हा ट्विटर ट्रेंडही जोरदार चालवला जात आहे.
दीपिकाने जेएनयूला दिलेल्या भेटीनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड तिच्या पाठीशी उभे राहिले आहे. तिने धाडस दाखवले, असे ट्विट शबाना आझमी यांनी केले आहे. जेएनयूच्या हल्लेखोरांना कडक शिक्षा करा अशी मागणी करणाऱया स्वरा भास्करने दीपिकाचे कौतुक आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दीपिकाबद्दलचा आदर द्विगुणीत झाल्याचे सांगितले. हिंसाचाराचा निषेध करणाऱया लोकांनी ‘छपाक’ हाऊसफुल करा, असे आवाहन अनुरागने केले.
‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
ऍसिड हल्ल्याची शिकार झालेल्या मुलीची कथा सांगणाऱया ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्त्यानीच प्रदर्शनाच्या स्थगितीची मागणी हायकोर्टात मागे घेतली. न्यायमूर्ती एस.सी. गुप्ते यांच्या खंडपीठाणे ही बाब लक्षात घेत या याचिकेवरील सुनावणी सहा आठवडय़ांसाठी तहकूब केली.
























































