
शिर्डी शहराच्या विविध प्रश्नांबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान शिर्डी शहराच्या विकास आरखाड्यात झालेल्या गैरव्यवहारासह कंत्राटी कामगारांचे प्रश्न, शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शिर्डी ते सरला बेट रस्ता, वंचीत सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसह, शहरात मेडीकल कॉलेज सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यासह संबधित खात्याच्या मंत्र्याबरोबर चर्चा करण्यात आल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
शिर्डी शहराचा विकास आराखडा 1992 साली करण्यात आला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या संगनमताने यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. हा बदल करताना मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याचे बोलले जाते. यामुळे अनेक गरीब लोकांवर अन्याय होणार आहे. या विकास आराखाड्यातबाबत मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या असून त्याची नुकतीच सुनावणीही झाली आहे. त्या हरकतींचा विचार करून योग्य ते बदल करण्यात यावे व गरीबांवर अन्याय होता कामा नये अशी मागणी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. हा बदल करताना स्थानिक परिस्थितीचा विचार करण्यात यावा, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात शिवसेना नेते कमलाकर कोते, तालुकाप्रमुख संजय शिंदे, शहरप्रमुख सचिन कोते, राहुल गोंदकर, महेश महाले, अनिल पवार आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबतही मुख्यमंत्र्यार्शी चर्चा करण्यात आली. गेल्या 20 वर्षांपासून कंत्राटी कामगार साईबाबांची सेवा करत आहे. मात्र अद्यापही त्यांच्या पदरी काहीच मिळाले नसल्याचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून दिले. साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थेने ऑक्टोबर 2018 अखेर सर्वच कंत्राटी कामगार कायम करण्याचा ठराव केला आहे, या ठरावाची अमंलबाजावणी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली. शिर्डी शहरात कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच शहरात अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे गाऱ्हाणे शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यासमोर मांडले. तसेच वाहतुक शाखेकडून साईभक्तांची पिळवणूक करण्यात येते. यावर आळा बसवण्यासाठी तात्काळ उपयोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिर्डी ते सरला बेट हा रस्ता शिर्डीसह पुणतांबा, सरलाबेट या तीन तिर्थस्थळांना जोडतो. या रस्त्याला केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वता मान्यता दिली आहे. मात्र अद्याप त्याचे काम सुरू झाले नाही. सरकारने या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याबरोबरच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची भेट घेतली. यासर्व भेटी दरम्यान शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते. तसेच या सर्व विषयांबाबत मंत्रालयात लवकरच संबधित खात्यांच्या मंत्र्यासह अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेणार येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला दिले.
शिर्डी संस्थानची 1948 पासून रूग्णसेवा सुरू असून 1965 पासून सुसज्य असे हॉस्पीटल आहे. येथे दररोज हजारो रूग्ण सेवा घेत आहे. मात्र राजकीय दबावापोटी येथे अजून वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे तात्काळ मेडीकल कॉलेज सुरू करण्याची मागणी शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली. याबाबत देशमुख यांच्यासह मुख्यमंत्रीही सकारात्मक असून त्या दिशेने पावले उचलण्यात येणार आहे.


























































