सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार, अजित पवारांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी लिहिता, वाचता, बोलता आले पाहिजे. अलिकडील काळात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांची संख्या वाढतेय, परंतु त्यांना मराठी येत नाही, हे दुर्देव आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे. अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बारामती शहर व तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा जंगी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अजित पवार बोलत होते.
पवार म्हणाले, मराठी भाषेच्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर परिणाम होईल. परंतु मातृभाषा टिकविण्यासाठी हा निर्णय गरजेचा आहे.

पोलिसांसाठी नवे गृहप्रकल्प

पोलिसांना चांगले घर उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई, पुणे आणि पनवेल येथे नवे प्रकल्प सुरू करणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

‘सारथी’च्या नावाखाली वेगळं होत असेल तर बदल करू!

राज्यातील मराठा मुलांसाठी ‘सारथी’ अस्तित्वात आली, ते काम योग्य होत असेल तर सरकार त्यांच्या पाठीशी, परंतु सारथीच्या नावाखाली कुणी काही वेगळं करत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर तिथे बदल केला जाईल. त्यातील त्रुटी दूर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले, सारथी संस्थेमुळे चांगलेच झाल्याची बाजू ऐकायला मिळते. तर दुसरीकडे त्यासंदर्भातील वेगळीच फाईल मंत्रालयात आली आहे. ती फाईल मी मागवून घेतली आहे. सारथी संस्था जर मराठा समाजातील मुलांना किंवा ज्या घटकांसाठी सारथी अस्तित्वात आली आहे ते काम तिथे योग्य चालले असेल तर सरकार त्याच्या पाठीशी राहील. परंतु सारथीच्या नावाखाली कुणी काही वेगळं करत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर तिथे बदल केला जाईल.

शिवसेनेची सातत्याने मागणी

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करा अशी शिवसेनेने सातत्याने मागणी केली होती. आमदार विलास पोतनीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. तर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनही दिले होते.