
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा हेतू हा एखाद्यला नागरिकत्व बहाल करण्याचा आहे, त्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. गुजरातमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच विरोधी पक्षांनी या कायद्याविरोधात अफवा पसरवून देशात अराजकता माजवली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अमित शहा म्हणाले की, “नागरिकत्व कायद्यामुळे हिंदुस्थानचे शेजारील तीन देश अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील राहणार्या अल्पसंख्यांकांना नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्याचा हेतुच तसा आहे. या या कायद्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे कुठलाच मुद्दा नाही, त्यामुळे विरोधी पक्षीयांनी याबाबत खोटी माहिती पसरवली आणि देशात अराजकता निर्माण झाली.” भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना या कायद्याबाबत माहिती द्यावी असे आवाहन शहा यांनी केले.

























































