केडगावमध्ये घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंद घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप-कोयंडा तोडून अज्ञात चोराने घरातील 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर केडगावमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संतराम शंभू मोरे (रा. अयोध्यानगर, केडगाव) पुणे येथील नातेवाईकांच्या घरी कुटुंबासह शुक्रवारी सायंकाळी गेले होते. त्यावेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक करुन लॉकरमधील 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 5 हजार रुपयेची रोकड असा ऐवज चोरुन नेला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोरे कुटुंबीय पुणे येथील कार्यक्रम आटोपून घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत पाहिले असता आतील सामानाची उचका-पाचक झालेली दिसली. यावरुन घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी फिंगरप्रिंट ब्युरो तसेच श्‍वान पथकालाही बोलावले. मात्र, श्वान पथकातील श्वान घराच्या आजुबाजुलाच घुटमळले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांबाबतची काहीच माहिती मिळाली नाही. या प्रकरणी संतराम मोरे यांच्या तक्रारीवरुन घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत.