
सातारा जिल्ह्यातील भुमिअभिलेख कार्यालयात शेतकर्यांची कामे होत नाहिये. शेतकर्यांची कामे लवकरात लवकर व्हावी अशी मागणी बळीरजा शेतकरी संघटनेने केली आहे. असे न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कराड भुमिअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. शेतकरी वर्गाच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांनी मोजणीबाबत अनेक तक्रारी बळीराजा संघटनेकडे दाखल झाल्या आहेत. किरकोळ काम अनेक महिने होत नाही. कार्यालयातील कर्मचारी उघड-उघड बिनधास्त पैशाची मागणी शेतकऱ्यांच्याकडे करतात, शेतकर्यांची कामे जाणूनबुजून लवकर करीत नाहीत, शेतकर्यांना नाहक हेलपाटे मारावे लागतात. मागील एकाच महिन्यात दोन कर्मचारी लाचलुचपत विभागाने पैसे स्विकारताना रंगेहाथ पकडले आहेत असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांची शेतजमीन मोजणीची प्रकरणे, शेतजमिनीच्या वाटप प्रकरण, सिटी सर्व्हे नोंदी असे अनेक कामे घेऊन शेतकरी या कार्यालयात येत असतो. वयस्कर शेतकरी, महिला शेतकरी यांना वारंवार हेलपाटे मारूनही कामे वेळेवर होत नाहीत. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. टेंभू येथील धरणामुळे बाधित शेतकऱ्यांची जमीन मोजणी न झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळालेली नाही. कर्मचार्यांनी कामात सुधारणा न केल्यास बळीराजा शेतकरी संघटना भुमिअभिलेख कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रांताधिकारी अनंत दिघे यांना निवेदन दिले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

























































