पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध घोषणा देणाऱ्यांना जिवंत पुरु; भाजप नेत्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीएए आणि एनआरसीविरोधी आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपमानास्पद घोषणा देणाऱ्यांना जिवंत पुरु ,अशी धमकी देत भाजप नेते रघुराज सिंग यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजप प्रवक्ते चंद्रमोहन यांनी रघुराज यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. एकतर ते मंत्रीही नाहीत किंवा आमदार त्यामुळे त्यांच्या मताला तशी किंमत देण्याची गरज नाही ,अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

अलिगढ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (सीएए ) जनजागृती करण्यासाठी भाजपने मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना भाजपनेते रघुराज सिंग यांचा तोल सुटला. ते म्हणाले ,देशातील 1 टक्का गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि भ्रष्टचारी लोक पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात खोटे- नाटे पसरवून त्यांना बदनाम करू पाहत आहेत, अशा लोकांना मी जिवंत पुरेन,अशी धमकी त्यांनी दिली.

आंदोलकांना कुत्र्यासारखे मारू – भाजप नेते दिलीप घोष
पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारविरोधी आंदोलन आंदोलन करताना सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक संपत्तीची जाळपोळ ,तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना आम्ही कुत्र्यासारखे गोळी घालून मारू ,असे खळबळजनक विधान पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी खड्गपूर येथील सीएए समर्थनासाठी आयोजित मेळाव्यात केले आहे. घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेलाच आक्षेप घेत सांगितले की ,बंगालमध्ये सीएए विरोधक आंदोलक सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करीत आहेत. ती त्यांच्या बापजाद्यांनी कमाईतून उभी केलेली नाही. सामान्य जनतेने भरलेल्या करांतून उभी केलेली आहे .हे सर्व भाजप विरोधक ममता यांचे मतदार असल्याने त्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत. हा प्रकार योग्य नाही, असे ते म्हणाले.