
झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना रखडल्या असून अनेक प्रकल्पांचे बांधकाम बंद झाले आहे. एसआरएमध्ये रहिवाशांना घरभाडे मिळत नाही. घरभाड्यात बाजारभावाप्रमाणे वाढ होत नाही. राहण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून बांधण्यात आलेली संक्रमण शिबिरे व्यवस्थित नाहीत. वीजपुरवठा तसेच अशा विविध कारणांनी रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देऊन ते प्रकल्प मार्गी लावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत देण्यात येणाऱ्या सदनिकांची संख्या वाढली पाहिजे तसेच या योजनेत पात्र झोपडपट्टीधारकांचे परिशिष्ट-२ तयार करण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी व त्यासाठी विशेष कालमर्यादा आखून द्यावी असे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. pic.twitter.com/58qfU5efHg
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 13, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात गृहनिर्माण विभागाच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या. एसआरएबरोबरच म्हाडा वसाहती, धारावी पुनर्वसन प्रकल्प तसेच रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांबाबत माहिती घेतली. त्याचप्रमाणे हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निर्देश दिले.
परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी मुख्य सचिवअजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार यांच्यासह म्हाडा, एसआरए, महारेरा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, धारावी पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात आठवडाभरात अहवाल द्या!
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावली 33 (9) खाली म्हाडाने येत्या 15 दिवसांत किमान दोन प्रस्ताव सादर करावेत. म्हाडाच्या गोरेगाव-सिद्धार्थनगर पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्या मूळ घरमालकांना थकलेल्या भाड्यापोटी किती रक्कम द्यावी लागेल याचा प्रस्ताव येत्या 15 दिवसांत सादर करावा पत्रा चाळ प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडाला दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा पुनर्विकास
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा. गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्याची गरज आहे. पुनर्विकासाचा सर्वात मोठा स्रोत म्हाडा आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करताना मूळ मालकालाच घरे मिळाली पाहिजेत. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लोकसंख्येनुसार प्रसाधनगृहांची संख्याही वाढवावी, असे आव्हाड म्हणाले. राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज या वेळी व्यक्त केली.
झोपडपट्टीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा निर्माण करा
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत देण्यात येणार्या सदनिकांची संख्या वाढायला हवी. पात्र झोपडपट्टीधारकांचे परिशिष्ट-2 तयार करण्यात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करावी व त्यासाठी निश्चित कालमर्यादा आखून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
धारावी पुनर्वसनात लघुउद्योगांना वेगळी जागा द्या
धारावीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना लोकांसाठी घरे देण्याबरोबरच वर्षानुवर्षे जे लघुउद्योग सुरू आहेत त्यासाठीही वेगळी जागा द्यावी व या प्रकल्पाबाबत लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
पत्रा चाळ रहिवाशांनी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार
पत्रा चाळ प्रकल्पासाठी 2008 मध्ये म्हाडा, विकासक आणि रहिवासी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. त्या वेळी शासनावर विश्वास ठेवून 672 भाडेकरूंनी आपली घरे रिकामी केली होती. त्यामुळे 47 एकर जमीन मोकळी झाली होती, मात्र विकासकाकडून मूळ रहिवाशांची घरे रखडवली. भाडेकरूंसाठी बांधावयाचे इमारतीचे अपूर्ण राहिलेले बांधकाम म्हाडाने पूर्ण करून द्यावे व शिल्लक भाडे द्यावे, अशी मागणी घेऊन भाडेकरू गेली दोन-तीन वर्षे आंदोलने व पाठपुरावा करीत आहेत. या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आकश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडाने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे व रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. उद्धव ठाकरे यांच्या निर्देशांमुळे या रहिवाशांना दिलासा मिळाला असल्याने या भाडेकरूंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांचे आभार मानले.
























































