‘निर्भया’ दोषींच्या फाशीची रंगीत तालीम; तिहारमध्ये पार पडली ‘डमी फाशी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील निर्भयावरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता फासावर लटकविले जाणार आहे. मात्र तत्पूर्वी रविवारी तिहार कारागृहात या फाशीची रंगीत तालीम घेण्यात आली.

डमी फाशीच्या या प्रक्रियेअंतर्गत दगडमातीने या चौघांच्या आकाराच्या आणि वजनाच्या गोणी भरण्यात आल्या आणि या चार गोणी फासावर लटकविण्यात आल्या. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता या चार नराधमांना अशाच प्रकारे फाशी देण्यात येणार आहे. हेच चार दोर या नराधमांच्या फासासाठी वापरले जाणार आहेत. मिरतहून पवन जल्लाद या चौघांना फाशी देण्यासाठी येणार आहे असे उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाने सांगितले.

डमी फाशीची रंगीत तालीम रविवारी सकाळी घेण्यात आली. तिहार कारागृहातील कोठी नंबर 3मध्ये ही रंगीत तालीम झाली. यावेळी कारागृह अधीक्षकही उपस्थित होते. वास्तविक दोषींपैकी एकाने विनय शर्मा याने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करत फाशीपासून वाचण्याचा निकराचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.