फाशीच! सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही क्युरेटिव्ह याचिका फेटाळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील निर्भयावरील सामूहिक अत्याचार प्रकरणातील चौघाही दोषींची फाशी आता निश्चित झाली आहे. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी दोघा दोषींनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.

निर्भया गँगरेप प्रकरणावर सुनावणी करणाऱया न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठानेच दोघा दोषींच्या याचिकांना केराची टोपली दाखवली. खंडपीठात न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर. एफ. नरीमन, न्यायमूर्ती आर. भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा समावेश आहे. गेल्याच मंगळवारी दिल्लीतील एका न्यायालयाने मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षयकुमार सिंह (31) यांच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी केले असून त्यांना 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार कारागृहात फासावर लटकविले जाणार आहे.

खटला रखडविण्याचा प्रयत्न
मंगळवारी सुनावणी होण्यापूर्वी निर्भयाची आई आशादेवी यांनी सांगितले की, ‘या याचिका म्हणजे खटला आणखी रखडविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मला खात्री आहे की नराधमांच्या या याचिका कधीच मंजूर होणार नाहीत.’ त्यांना 22 जानेवारीला फाशी होणारच, असेही त्यांनी सांगितले. आशादेवी यांनी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका दाखल करत दोषींच्या विरोधात ‘डेथ वॉरंट’ जारी करण्याची मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने आशादेवींच्या बाजूने निकाल देत 22 जानेवारी रोजी दोषींच्या फाशीला मंजुरी दिली.