
धावत्या ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशाला चोरटय़ांनी लुबाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असल्याने खळबळ उडाली असून सर्व यंत्रणा हा व्हिडीओ नेमका कुठला याचा शोध घेत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेने हा व्हिडीओ आपल्या हद्दीतील तसेच ट्रेनमधील नसल्याचे स्पष्टीकरण केले असून तो उत्तरेकडील गाडय़ांमधील असावा असा कयास केला जात आहे.
स्थानक जवळ आल्याने दरवाजाजवळ रात्रीच्या वेळी गाडीतून उतरण्यासाठी उभ्या असलेल्या एका वयस्क महिलेची पर्स धावत्या ट्रेनमध्ये चढून लुटारूंनी चोरल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरत आहे. या घटनेतील महिला चालत्या ट्रेनमधून पडता पडता वाचल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. काल हा व्हिडीओ पारसिकच्या बोगद्यातील असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केल्याची ब्रेकिंग न्यूज झाल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. या प्रकरणाचा शोध घेतला असता तो मध्य अथवा पश्चिम रेल्वेच्या ट्रेनमधील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओ कदाचित उत्तरेकडील अमृतसर एक्स्प्रेस अथवा अन्य गाडीचा असावा असा कयास केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणीही फिर्याद दाखल न केल्यानेही कोडे पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


























































