विधान परिषद पोटनिवडणूक राष्ट्रवादीचे संजय दौंड, भाजपकडून राजन तेली यांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच शिवसेनेचे सदस्य तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. मुंडे यांच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दौंड यांनी तर भाजपकडून राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तानाजी सावंत यांच्या रिक्त झालेल्या यवतमाळ  स्थानिक स्वराज्य  संस्था मतदारसंघात शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या सुमित बजोरिया यांच्याशी त्यांचा मुकाबला होणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानसभेतून विधानसभेवर पाठवण्यात येणारी एक जागा रिक्त झाली असून या जागेसाठी 24 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत होती. राष्ट्रवादीने या जागेसाठी परळीच्याच संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दौंड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून राजन तेली यांनी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार, विनोद तावडे, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. संजय दौंड हे माजी आमदार पंडितराव दौंड यांचे चिरंजीव आहेत.

माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभेवर निवडून आल्याने यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. येथे  शिवसेनेने दुष्यंत चतुर्वेदी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, वन मंत्री संजय राठोड, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत यवतमाळ येथे अर्ज दाखल केला. या ठिकाणी भाजपने सुमित बाजोरिया यांना उमेदवारी दिली आहे. सुमित बजोरिया हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे धाकटे बंधू आहेत. अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणारे बाजोरिया यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.