
महाराष्ट्रातील प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला जोरदार धमाका करणारी पहिली मुलाखत दिली. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे हादरे दिल्लीपर्यंत बसले. देशाला नवी दिशा मिळाली. पडद्यामागे आणि समोर नक्की काय घडले? यावर उद्धव ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केले. राजकीय पटावरील कोणती प्यादी कशी हलवण्यात आली यावर मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती अत्यंत विनम्रतेने बोलताना पाहिले. ‘‘मी काय मागितले भाजपकडे? जे ठरले होते तेवढेच द्या. मी त्यांच्याकडे चांद-तारे मागितले होते काय?’’ असा प्रश्नच त्यांनी निर्माण केला.
उद्धव ठाकरे यांनी मनमोकळेपणानं सांगितलं, ‘‘भारतीय जनता पक्ष शब्दाला जागला असता तर मी मुख्यमंत्री पदावर दिसलो नसतो. एखादा शिवसैनिक तेथे विराजमान झाला असता. पण हे त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल आहे!’’
सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी उत्तरे दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात प्रचंड आत्मविश्वास, तितकीच विनम्रता, संस्कार या गुणांचे दर्शन झाले आणि त्याच वेळी अहंकाराचा अभाव दिसला. महाराष्ट्राला जसा मुख्यमंत्री हवा होता तसाच मुख्यमंत्री मिळाला आहे.
मंत्रालयातून नागपूरच्या ‘मेट्रो’चे उद्घाटन करून मुख्यमंत्री ‘सामना’ स्टुडिओत आले. स्टुडिओतील फरशी बुद्धिबळाच्या पटासारखी होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘मार्मिक’ भाष्य केले. मुख्यमंत्री काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे असे त्यांना सांगताच ते सहज म्हणाले, ‘‘ही महाराष्ट्राची आणि छत्रपती शिवरायांची ताकद आहे.’’
उद्धवजी, आपण धक्क्यातून सावरलात का?
– धक्का? कसला धक्का? मला बसलाय असं वाटतं का?
नाही. तसं मलाही वाटत नाही, पण…
– नाहीच वाटणार. याचं कारण मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, धक्के द्यायचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले, पण कोणालाच ते जमलं नाही. किंबहुना शिवसेनाप्रमुखांनी जे धक्के अनेकांना दिले त्यातनं ते लोक अजूनही सावरलेले दिसत नाहीत. हे क्षेत्र असं आहे की यात धक्का किंबहुना धक्काबुक्की गृहीत धरून चालायचे असते. मघाशी आपण सुरुवात करताना बुद्धिबळाच्या पटाचा उल्लेख केलात. बुद्धिबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ नक्कीच आहे. पण त्यात विविध सोंगटय़ा किंवा काय म्हणतात… प्यादी, हत्ती, घोडे, राजा, वजीर, उंट या प्रत्येकाच्या चाली जर आपण लक्षात घेतल्या तर बुद्धिबळ खेळणं कठीण आहे असं मला वाटत नाही.
उद्धवजी, बुद्धिबळ हा एक प्रतिष्ठत खेळ आहे. खरोखरच तिथे बुद्धी पणाला लावावी लागते.
– नक्कीच. पण बुद्धी असेल तर ना.
पण महाराष्ट्रात या बुद्धिबळाच्या खेळाला षड्यंत्र आणि कारस्थानाचं स्वरूप आलंय, ते षड्यंत्र म्हणा, कारस्थान म्हणा तुम्ही उधळून लावलंत. हा धक्का अनेकांना बसलाय, हा माझा सांगण्याचा हेतू आहे. तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीत हाच मोठा धक्का होता असं वाटत नाही का?
– नाही. एक लक्षात घ्या. मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं. अत्यंत प्रामाणिकपणानं हे मी कबूल करतो की, मी शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न- मग त्याच्यात ‘सामना’ची निर्मिती असेल, शिवसेनेची वाटचाल असेल आणि माझ्यापुरतं म्हणाल तर मी म्हणजे स्वतः उद्धव याने त्याच्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दिलेलं वचन! त्या वचनपूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. ते पाऊल त्या दिशेने टाकताना मी मनाशी ठरवलेय की कोणत्याही थराला जायचं, पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करायचंच आणि ते मी करणारच.
पण या धक्क्यातून अद्याप महाराष्ट्र सावरलाय का?
– धक्के अनेक प्रकारचे असतात. लोकांना हे पटलंय की नाही पटलंय, आवडलंय का नाही आवडलंय हा महत्त्वाचा भाग आहे. मी अनेकदा या विषयावर बोललोय आणि जनतेलाही ते पुरेसं कळलंय. वचन देणं आणि वचन निभावणं यात फरक आहे. वचनभंग झाल्यावर साहजिकच दुःख आहे, रागही आहे. ‘त्यांनी’ कशासाठी हे केलं? का वचन दिलं आणि का वचन मोडलं? मग त्यांनी अशा पद्धतीने वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
पण या धक्क्यातून तुमचा पंचवीस वर्षांचा साथीदार असलेला भारतीय जनता पक्ष सावरला का?
– मला माहिती नाही. पण माझं त्यांना असं म्हणणं आहे की, त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं! असं काय मी मोठं मागितलं होतं… आकाशातले चांद-तारे मागितले होते की काय मागितलं होतं! मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरलं होतं तेवढंच मागितलं होतं.
म्हणजे त्यांनी तुम्हाला धक्का द्यायचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्यांना उलटा धक्का दिलात. असंच म्हणावं लागेल…
– मी मघाशीच म्हटलं ना की, या क्षेत्रात धक्का आणि धक्काबुक्की हे आलंच.
धक्काबुक्कीच झालीय. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारची धक्काबुक्की कधीच झाली नव्हती.
– पण यात धक्का देणं आणि बुक्का देणं या दोन्ही गोष्टी आल्या.
धक्का कोणी खाल्ला आणि बुक्का कोणाला मिळाला?
– महाराष्ट्र आणि देश बघतोय. मी अधिक काही सांगण्याची गरज नाही.
तुमचा शब्द बाळासाहेबांना होता ती शब्दपूर्ती, ती वचनपूर्ती तुम्ही केलीत असं तुम्ही आता म्हणालात.
– नाही. माझा मुद्दा नीट समजून घ्या. त्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं पाऊल आहे. हो पहिलं पाऊल. हीच माझी भूमिका आहे.
अशी किती पावलं आपण टाकणार आहात?
– जेवढी टाकावी लागतील तेवढी टाकेन, पण मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसवणार हे माझं वचन आहे आणि त्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे, असं मी मानतो.
पण हे करण्यासाठी तुम्हाला तत्त्वाला आणि ठाकरे कुटुंबाच्या परंपरांना मुरड घालावी लागली असं वाटत नाही का?
– हो बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं आहे, नक्की आहे. पण शेवटी कसं होतं… शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात कधी सत्तेचं कोणतंही पद स्वीकारलं नाही. माझीही तशी इच्छा नव्हती, अजिबात नव्हती. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की, ज्यांच्यासोबत आपण आहोत किंवा होतो त्यांच्यासोबत राहून मी माझ्या वचनपूर्तीच्या दिशेनं जाऊ शकत नाही आणि त्या वचनपूर्तीसाठी वेगळी दिशा जर मला स्वीकारायची असेल तर तशी तयारी असायला हवी. त्यासाठी जर मला ही मोठी जबाबदारी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसेल तर माझा नाइलाज होता. ती जबाबदारी स्वीकारावीच लागली.
23 जानेवारी हा शिवसेनाप्रमुखांचा जन्मदिवस… या वेळी तो वेगळा वाटला का?
– हो. नक्कीच वेगळा वाटला. लहानपणापासून मी हे सगळं वातावरण पाहत पाहत मोठा झालो आहे. त्या काळात शिवसेनाप्रमुखांना भेटायला लोक प्रचंड संख्येने येत, आपुलकीने येत. एका प्रेमानं, मायेनं येत. नंतरच्या काळात जेव्हा शिवसेनाप्रमुख कुणाला भेटू शकत नव्हते तेव्हा त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी ‘मातोश्री’वर होणारी अलोट गर्दी मी पाहिलीय. पहाटेपासून शिवसैनिक यायचे. मला अजूनही आठवताहेत डोंबिवलीचे ते अमोणकर होते. त्यांच्यासारखे असे असंख्य शिवसैनिक पहाटेपासून यायचे, गर्दी करून राहायचे. तेव्हा शिवसेनाप्रमुखसुद्धा ऐन उमेदीच्या वयात होते. ते सगळय़ांना भेटायचे.
मी यंदाचा 23 जानेवारी वेगळा अशासाठी म्हटलंय, की तुमची वचनपूर्ती झाल्यानंतरचा हा पहिला जन्मदिन होता. ‘मातोश्री’वर या वेळी मुख्यमंत्री राहात होते. या अर्थाने हा वेगळा होता का?
– मातोश्री आणि शक्ती… सत्ता नाही म्हणत मी. शक्ती! या दोन्ही गोष्टी नेहमीच एकत्रित राहिल्या आहेत. पुढेही राहतील. सत्ताप्राप्ती किंवा सत्तेत आपण येणं हा एक वेगळेपणाचा अनुभव नक्की आहे आणि होताच. मी म्हटलं तसं ‘मातोश्री’ आणि शक्ती या एकत्रित असणाऱया दोन गोष्टी आहेत. त्यामुळे नवीन काही घडलंय असं मला वाटलं नाही. कारण ती गर्दी, तो सगळा जल्लोष मी लहानपणापासून पाहतोय.
राज्याची सत्ता त्या वास्तूत आली.
– हो. हे खरंय.
आता जेव्हा मी फोन करतो…अनेकदा नेहमीप्रमाणे तेव्हा ‘मातोश्री’ या एका शब्दामध्ये आम्ही समाधान पावत होतो. आता तिथून आम्हाला ऐकायला येतं, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान.
– हे शिवसैनिकांचंच कर्तृत्व आहे. याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे. हे ऐश्वर्य, वैभव ही शिवसेनाप्रमुखांची, माझ्या माँची पुण्याई आणि शिवसैनिकांचं अपार प्रेम आणि श्रद्धा यामुळेच शक्य झालं. त्यात माझं कर्तृत्व खरोखरच शून्य आहे.
आज जर माँसाहेब असत्या तर त्यांना काय वाटलं असतं, असा विचार कधी तुम्ही करता?
– माँ कशाला… बाळासाहेब असते तरी त्यांना असं वाटलं असतं की, अरे बापरे! याला हे झेपेल की नाही! माँच्या बाबतीत मातृसुलभ अशी आपल्या मुलाबाबत भावना नक्कीच असली असती. त्याच बरोबरीने कौतुकही नक्कीच असलं असतं.
झेपेल की नाही हा प्रश्न महाराष्ट्रात अनेकांना पडला होता. तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्रं हाती घेतलीत तेव्हाही हाच प्रश्न अनेकांना पडला होता. पण आपण नुसतं झेपवून घेतलं नाहीत तर झेपावलात आणि आतासुद्धा मुख्यमंत्रीपदाबाबत तुम्हाला हे झेपेल की नाही हा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांना तुम्ही तुमच्या कामानं उत्तर देताय. तुम्हाला कधी हा प्रश्न पडला होता का, की आपल्याला हे झेपेल की नाही?
– नाही. मला असा प्रश्न अजिबात पडला नाही. मी जे काही करतो ते तळमळीने करतो. मनापासून करतो. कोणतीही जबाबदारी घ्यायची तर त्या विषयाच्या खोलवर जाऊन अभ्यास करायचा आणि त्यात चांगल्यात चांगले काम करता येईल हाच प्रयत्न करायचा. हा माझा नेहमीचाच प्रयत्न असतो आणि राहणार.
महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का?
– मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं!
कोणी बिघडवलं असं वाटतं आपल्याला…
– ज्यांचं बिघडलं असेल त्यांनी स्वतःहून ते बिघडवलंय. बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.
उद्धवजी, लोकसभा निवडणुकीपूर्वी एक चित्र स्पष्ट होतं की, शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढायला सामोरी जातेय. तशी तयारीही झाली होती. पण त्यानंतर अचानक देशानं पाहिलं की, अमित शहा आपल्याला भेटायला आले आणि आपण शहांच्या प्रचंड प्रेमात पडलात…
– हे बघा, जे करायचं ते दिलखुलासपणे करायचं. चोरूनमारून करायचं नाही. हा माझा स्वभाव आहे. तुम्ही बघा, तो काळ तसा होता. ते समोरून आले. ते स्वतःहून आपल्याकडे आलेत म्हटल्यावर मलाही असं वाटलं, की ठीक आहे. मधल्या काळात काहीही घडलं असलं तरी त्याआधी वर्षानुवर्षे आपली युती होती. आता पिढी बदलली. कदाचित त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं असेल. पण पुन्हा संबंध सुधारत असतील आणि आपलं उद्दिष्ट आणि ध्येय एक असेल तर मार्ग धुंडाळत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून नवीन सुरुवात करायला काय हरकत आहे!
पण नवीन सुरुवात फार रुचलेली दिसत नाही…
– तेवढय़ापुरती तरी ती रुचली होती. तेव्हाही आपण बघितलं असाल, तेही मला अगत्याने बोलवत होते. अहमदाबादला मी गेलो होतो अमितजींचा अर्ज भरताना. त्यानंतर नरेंद्रभाईंचा अर्ज भरताना वाराणसीला गेलो होतो. माझ्या मनात कुठेही मधल्या काळातली कटुता नव्हती. किंतु-परंतु नव्हता. किल्मिष मी ठेवलं नव्हतं. त्यापलीकडे जाऊन लोकसभेच्या वेळी युतीचा प्रचारही केला.
विधानसभा निवडणुका आल्या तेव्हा जागावाटपात थोडय़ाशा कटकटी झाल्या हे सगळय़ांनी पाहिलं. आपणसुद्धा दोन पावलं मागे गेलात आणि युती टिकवलीत…
– हिंदुत्वासाठी टिकवली. हिंदुत्व महत्त्वाचं!
हो, हिंदुत्वासाठी आपण युती टिकवलीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही असं पाहिलं की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला उल्लेख ‘मेरा छोटा भाई’ असा करायचे…
– मला तेवढं पुरेसं होतं.
आपण त्यांचे छोटे भाई झाला होतात…
– अर्थात! वयाने मोठ्या माणसाचा मोठा भाऊ कसा होणार!
तरीही ते नातं टिकलं नाही…
– हे नातं टिकवण्याचा प्रयत्न दोन्हीकडून व्हायला हवा होता. माझ्याकडून तरी ते नातं टिकवण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला.
आणि देवेंद्र तर तुमचा उल्लेख ‘माझे मोठे भाऊ’ असाच करीत होते…
– हो. या दोन भावांच्यामध्ये मी कात्रीत पकडला गेलो.
पण ही भाऊबंदकी का झाली मग? एकप्रकारे चांगलं चाललेलं घर होतं, त्यात भाऊबंदकीचं चित्रसुद्धा महाराष्ट्राने पाहिलं… ही नाती अशी का तुटली?
– मी आजही सांगतो, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याकरिता जन्माला आली. मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर देशातील हिंदूंवर गंडांतर येतंय असं शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आलं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला. 1987 सालची पोटनिवडणूक ही कदाचित पहिली निवडणूक असेल, जी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर केवळ लढलीच नाही तर जिंकलीही असेल. मग भाजप सोबत आला. त्यानंतर जे काय घडलं… मग रथयात्रा असेल… वगैरे वगैरे करीत दोन समविचारी पक्ष एकत्र आले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही.
मग आज हिंदुत्वाचं काय झालंय?
– आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहाणार! त्यात तडजोड नाही!
‘मी पुन्हा येईन’सारखी कोणतीही गर्जना न करता सत्तेवर आला आहात, पण अशाप्रकारे सत्तेवर येण्याची वेळ आधीच ठरली होती का?
– नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? तुमचा रोख कुठे आहे?
जे ‘पुन्हा येईन, पुन्हा येईन’ असे सांगत होते ते आले आणि 80 तासांत निघून गेले. तुम्ही मात्र सत्तेवर आलात त्या वेळी महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण घडलं…
– हे बघा, मी येईन असं कधीच बोललो नव्हतो. मी अशाप्रकारे येईन असं मला आणि जनतेलाही कधीच वाटलं नव्हतं. तसं पाहिलं तर या खुर्चीत बसण्याची महत्त्वाकांक्षा मी कधी व्यक्त केली नव्हती. किंबहुना स्वप्नातही मी कधी पाहिलं नव्हतं. तुम्ही श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा म्हणा, पण आपण जे वागत असतो ते कोणीतरी अज्ञात शक्ती बघत असते असाच अर्थ यातून घ्यावासा वाटतो. ही एवढी मोठी जबाबदारी त्यामुळेच तर माझ्याकडे आली असावी. देशात अनेक राज्ये आहेत, पण हे जे मुख्यमंत्रीपद आहे ते इतरांपेक्षा मोठं आहे. मोलाचं आहे. कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. अशा महत्त्वाच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर मला बसवलं गेलं हे त्या शक्तीचेच आशीर्वाद आहेत, बाकी दुसरं काय!
नेहमी असं म्हणतात, ही महत्त्वाची पदं म्हणजे काटेरी खुर्ची असते किंवा काटेरी मुकुट असतो. तुम्हाला असं वाटतं का?
– नाही! मला नाही वाटत तसं. याचं कारण असं की, काटेरी हे काटेरी असतंच, पण त्याच काटेरी झाडाला गुलाब पण येतोच आणि गुलाबाचा गुलकंद हा ज्यांना बद्धकोष्ठ आहे अशांसाठी उपचारही असतोच.
ठाकरे कधी सरकारी पदावर बसले नव्हते. किंबहुना महाराष्ट्राची – देशाची ही भावना होती की, ठाकरे हेच एक सरकार आहे; पण आता ठाकरे हे मंत्रालयातलं सरकार बनलेलं आहे. अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही की, खरोखर उद्धव ठाकरे तिथे जाऊन बसून काय करताहेत किंवा मुख्यमंत्री झालेत…
– हो. पण काम होतंय एवढं तरी कळतं ना. हे सरकार एका झपाटय़ानं कामं करतंय हे लोकांपर्यंत जातंय ना.
कळतंय, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हे महाराष्ट्राचं स्वप्न होतं. अजूनही काही लोकांना असं वाटतंय की, उद्धव ठाकरे हे ऑक्सिडेंटल चीफ मिनिस्टर आहेत…
– असतील, पण मघाशी जे आपण म्हणालात की, हे महाराष्ट्राचं स्वप्न होतं. हे असं स्वप्न एखाद्याच्या बाबतीत जनतेनं पाहणं हे किती जन्माचं भाग्य असेल मला माहीत नाही. हे पूर्वसंचित आहे. स्वतः तसं स्वप्न न बघता जनतेनं पाहावं आणि ते अनपेक्षितपणे, अनाकलनीय पद्धतीने मूर्त स्वरूपात यावं हे मोठं भाग्यच. स्वतः बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं की, स्वतः कधीही निवडणूक लढवणार नाही. निवडणूकच लढवणार नाही म्हटल्यावर सत्तापदाचा प्रश्नच येत नाही. पण तरीदेखील त्यांच्यावरही या निर्णयावरून टीका झाली. तुम्ही हे बाहेरून बोलता, स्वतः करून दाखवा. ठीक आहे. मग मी आता स्वतः करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे आम्ही सत्तेच्या खुर्चीवर नाही बसलो तरी टीका व्हायची ती झालीच आहे. म्हणून मी ठरवलं, आता स्वतः बसून तुम्हाला करूनच दाखवतो.
डॉ. मनमोहन सिंग या देशाचे उत्कृष्ट प्रधानमंत्री होते. दोन वेळा त्यांनी हे महत्त्वाचं पद सांभाळलं. देशाला अराजकाच्या खाईतून बाहेर काढलं. आर्थिक मंदीतून बाहेर काढलं. त्यांचाही उल्लेख ‘ऑक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असा करण्यात आला होता. एक मुद्दा तुम्हाला सांगतो. ज्यांच्याकडून सुरुवातीला फारशा अपेक्षा ठेवल्या जात नाहीत त्यांच्याकडून देशाची फार मोठी सेवा घडते. आपलासुद्धा जे ‘ऑक्सिडेंटल सीएम’ असा उल्लेख करतात त्यांना मी नेहमी, डॉ. मनमोहन सिंगांचं उदाहरण देतो…
– हो, पण त्यांच्या तुलनेत मी जरा जास्त बोलतो.
आपण मघाशी उल्लेख केला की, बाळासाहेबांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही; पण आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल…
– हो. ते तर ओघानं आलंच.
आता तुम्ही निवडणूक कुठून आणि कशी लढणार? की तेसुद्धा शेवटपर्यंत रहस्यच ठेवणार आहात?
– रहस्य नाही. येत्या दोन-चार महिन्यांत मला हा निर्णय घ्यावा लागेल.
तुम्हाला विधानसभेत जायला आवडेल की विधान परिषदेत?
– तुम्हाला सांगू का! मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन.
पण तुम्ही विधानसभेत जाणार की विधान परिषदेत…
– ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घेऊन…
म्हणजे विधान परिषदेत जाणार?
– विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे.
पण ही तर राज्यघटनेनं निर्माण केलेली व्यवस्था आहे…
– आहेच ना. मी कोणत्याही दारातून आलेलो नसल्यानं मी म्हणेन, मी वरून पडलोय…छपरातून.
n एक आरोप आपल्यावर सातत्याने होतोय आपल्या पूर्वीच्या मित्रांकडून की, हे सगळं करण्यासाठी आपण आपली तत्त्वं सोडलीत आणि मुख्य म्हणजे हिंदुत्वाशी तडजोड केलीत…
– मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.
n सरकार स्थापन करताना तीन विचारधारा एकत्र आल्या. अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा एकच आहे. त्या वेगळय़ा नाहीत. पण शिवसेनेचा विचार करता दोन मुख्य टोकाचे विचारप्रवाह होते ते प्रवाह एकत्र आले आहेत…
– यात दोन भिन्न विचारधारा, तीन भिन्न विचारधारा तुम्ही म्हणताय; पण केंद्रात जे सरकार आहे त्यात आता किती पक्ष आहेत? त्यांचे किती विचार आहेत? नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? चंद्राबाबूंची एक होती का? ममता बॅनर्जी त्यावेळी सत्तेत होत्या त्यांची विचारधारा एक होती का? जॉर्ज फर्नांडिस यांची विचारधारा एक होती का? रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? आता झारखंडमध्ये काय घडलं? तिथं विचारधारा जुळली का? सगळं कसं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसंच.
म्हणजे आता विचारधारा एक…
– एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. कश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का?
कश्मीरमध्ये तर फुटीरतावाद्यांशी हात मिळवून सरकार आलं होतं…
– हो ना. तिथे तसंच सरकार आलं होतं. अतिरेक्यांशी चर्चा झालेली आहे.
महाराष्ट्रात तसं झालेलं नाही…
– कुठे झालंय? विचारधारा वेगळी म्हणजे काय वेगळी आहे?
शरद पवार आणि सोनिया गांधी हे दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत. कालपर्यंत तुम्ही सगळे एकमेकांवर टीका करत होतात…
– हो. केली टीका.
आज आपण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आहात. याच्यावर भारतीय जनता पक्ष सातत्याने टीका करतोय…
– ठीक आहे ना. करूद्या त्यांना टीका. पण मग माझा प्रश्न असा आहे, पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग त्या पक्षासोबतच हात मिळवला तर काय फरक पडतो? त्या पक्षातले मोठमोठे नेते घेऊन भारतीय जनता पक्षातसुद्धा त्यांना सामावून घेतलंच आहे ना. कित्येक नेते काँग्रेसमधून त्यांनी घेतलेत. त्यांना आमदारक्या, खासदारक्या किंवा इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत. तेसुद्धा त्या विचारधारेवरच होते ना?
तिथे गेल्यावर शुद्ध होतात ते…
– तेच आहे ना! पण ही लॉण्ड्री तुमच्याकडेच आहे का? गंगाजल घेऊन शिंपडत फिरता सगळीकडे!
तिथे गेल्यावर वाल्याचा वाल्मीकी होतो ही यंत्रणा त्यांच्याकडे आहे तशी तुमच्याकडे आहे का?
– वाल्याचा वाल्मीकी हा खरं म्हणजे वाल्मीकी ऋषींचा अपमान आहे आणि वाल्याचासुद्धा अपमान आहे. कारण वाल्या प्रामाणिक होता. तपश्चर्या करून तो वाल्मीकी झाला. सत्तांतर करून नाही. तो या पक्षातून त्या पक्षात गेला आणि वाल्याचा वाल्मीकी नाही झाला. वाल्याने तपश्चर्या केली. त्यानंतरच त्याचा वाल्मीकी झाला आहे. आता यांची सत्ता गेली. आता पक्षांतर केलेल्या या सगळय़ांचं काय होणार पुन्हा. ही मंडळी आता काय करणार? ही उत्सुकता आहे. त्यामुळे त्यांना वाल्याचा वाल्मीकी झाला म्हणणं हा वाल्मीकी ऋषींचा अपमान आहे.
हे सरकारच अनैतिक आहे अशी त्यांची टीका आहे…
– नैतिकतेच्या गोष्टी कोणी कोणाला शिकवायच्या! मघाशी आपण उदाहरणं पाहिली. मोदींवर टीका करणारेसुद्धा त्यांना नंतर प्रिय होतात. त्यांच्या वॉर्डात जाऊन मोदी प्रचार करतात, ही नैतिकता? रामविलास पासवान त्यांच्याबद्दल काय बोलले होते? नितीशकुमार काय बोलले होते? आता बिहारमध्येच त्यांची आपापसात लागलीय, तरी ते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यामुळे तुम्ही नैतिकता शिकवू नका. यांच्याकडून राज्याला आणि देशाला नैतिकता शिकण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री म्हणून पहिली कॅबिनेट तुम्ही घेतलीत त्या क्षणी तुमच्या भावना काय होत्या?
– हे अगदी वेगळे अनुभव आहेत. कॅबिनेटचा हॉल प्रचंड मोठा आहे. त्याच्यात आता पूर्ण मंत्रिमंडळ बसतं; पण पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही मी, आदित्य… सात मंत्री. बाजूला सगळे ते प्रशासकीय अधिकारी. त्यात एक गोष्ट खास नमूद करायचीय. काही सरकारी मराठीतले शब्द आहेत. हे मराठीतले शब्द समजून घेणं हा एक अनुभव होता. पण आता हे सगळं हळूहळू अंगवळणी पडतंय. मुळात आपल्याला काय करायचंय हे स्पष्ट असलं की मग अडथळे येत नाहीत.
सत्ता म्हणजे काय हे तुम्हाला त्या वेळी लक्षात आलं का?
– मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी ती जनकल्याणासाठी राबवली. त्यामुळे मला हे नवीन नाही.
मंत्रालयातल्या पहिल्या दिवशी तुमचं प्रचंड स्वागत झालं. संपूर्ण मंत्रालय खाली उतरलं होतं. मंत्रालयातले कर्मचारी आपल्यावर पुष्पवृष्टी करीत होते. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून इतर सर्व दैवतांसमोर नतमस्तक झालात…
– मी मंत्रालयात रोज जाताना प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो. मग मी माझ्या कार्यालयात जातो.
तुमचं प्रचंड स्वागत झालं ते मुख्यमंत्र्यांचं होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राचं होतं…
– साहजिकच आहे. बाळासाहेबांच्या पुत्राचं, मुख्यमंत्र्यांचं आणि त्याहीपेक्षा आपल्या माणसाचं स्वागत होतं. हे आपलेपण मला त्यांच्या चेहऱयावर दिसत होतं.
तुम्ही शपथ घेतलीत तीच ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे…’ अशी. जनतेच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. त्या दिवशीच्या स्वागतात हे जाणवत होतं की, त्या सर्वांची भावना असावी की आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते. तुमच्या रूपानं तिथं बाळासाहेबांचं आगमन झालंय…
– मी उलट समजतो. माझ्या स्वागतासाठी किंवा मला आशीर्वाद देण्यासाठी जे लोक आले होते त्यांच्या रूपात मी बाळासाहेब आहेत असं मानतो आणि ते माझ्या अवतीभोवती सतत असतात.
आपण जेव्हा गेलात सहाव्या मजल्यावर, तिथे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आहे. तो मंगल कलश पाहिल्यावर आपल्या काय भावना होत्या?
– तो मंगल कलश पाहिल्यावर वाटलं, आजही संयुक्त महाराष्ट्राचं काम थोडं अपुरं आहे ही भावना नेहमी माझ्या मनात असते ती प्रकर्षाने त्या दिवशीही मनात आली. त्या मंगल कलशाबरोबरच माझे आजोबा मला सांगत त्या संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या आठवणी, माझ्या वडिलांकडून ऐकलेल्या त्या समर प्रसंगाच्या आठवणी उचंबळून आल्या. मंत्रालयात जाण्याआधी मी हुतात्मा स्मारकात गेलो होतो. त्या वेळी त्या हुतात्म्यांना वंदन करून मी हेच सांगितलं होतं की, तुम्ही जे रक्त सांडलंय या महाराष्ट्रासाठी हे रक्त मी कदापि वाया जाऊ देणार नाही. तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन.
संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अधुरं आहे असं आपण म्हणालात. तुम्ही बेळगावविषयी म्हणताय का?
– नक्कीच. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे त्याबद्दल बोलतोय.
मुख्यमंत्री म्हणून यासंदर्भात काही कठोर पावलं आपण टाकणार आहात का?
– कठोर पावले तर टाकावी लागतील, पण त्याबरोबरीने या विषयावर नेमलेल्या समितीच्या सर्व लोकांना मला बोलवायचं आहे. नक्की बोलावणार. मी महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांची त्यासाठी नेमणूक केली आहे. त्यांच्याकडून या विषयाचा पाठपुरावा केला जाईल. विशेष म्हणजे, हा विषय तूर्त न्यायालयात आहे. पण असं असतानाही कर्नाटक सरकार बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमा भागातील मराठी बांधवांवर भाषिक अत्याचार करतंय. त्याविरुद्ध वारंवार आवाज उठवला जातोय. त्याची दखल घ्यावीच लागेल. सर्वसाधारणपणे केंद्र सरकार हे राज्य सरकारचे पालक असते असं मानलं जातं. हा विषय कोर्टात असल्याने केंद्राने पालकत्वाची भूमिका दोन्ही राज्यांबद्दल घ्यायला हवी. केंद्राने निःपक्षपाती राहायला हवे. आमच्यापैकी कुणाचं चुकत असेल तर तुमची भूमिका कोर्टात सांगा. पण गेल्या पाच वर्षांत आश्चर्यकारकरीत्या केंद्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारची बाजू कोर्टात मांडत आहे हे संतापजनक आहे.
हे धक्कादायक आहे…
– नक्कीच. जो धक्का आहे तो धक्का आहे.
यात तुम्हाला कठोर पावले टाकावी लागतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सीमा प्रश्नाबाबत कठोर पावले टाकतील हे निश्चित. तूर्त आपण इथे विश्रांती घेऊ.
मातोश्री आणि शक्ती… सत्ता नाही म्हणत मी. शक्ती! या दोन्ही गोष्टी नेहमीच एकत्रित राहिल्या आहेत. पुढेही राहतील. सत्ताप्राप्ती किंवा सत्तेत आपण येणं हा एक वेगळेपणाचा अनुभव नक्की आहे आणि होताच. मी म्हटलं तसं ‘मातोश्री’ आणि शक्ती या एकत्रित असणाऱया दोन गोष्टी आहेत. त्यामुळे नवीन काही घडलंय असं मला वाटलं नाही. कारण ती गर्दी, तो सगळा जल्लोष मी लहानपणापासून पाहतोय.
एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. कश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का?
मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.
मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी ती जनकल्याणासाठी राबवली. त्यामुळे मला हे नवीन नाही.
































































