
लातूरमध्ये आयशर टेम्पो चालकाचे अपहरण करुन त्याच्याजवळील पैसे लूटून त्यांचा टेम्पोही पळवण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी जयराम आप्पासाहेब पाटील (रा. मुळकी, उमरगा ता. अहमदपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आयशर टेम्पोवर ते चालक म्हणून काम करतात. मालकाकडून पगाराचे 14 हजार रुपये घेऊन टेम्पो घेऊन ते गावाकडे निघाले होते. पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या टेम्पोला ओव्हरटेक केले आणि टेम्पोसमोर कार आडवी लावली. त्या कारमध्ये राजू शर्मा, त्याचा भाऊ, महादेव जाधव, चेतन गायकवाड हे चौघे होते. त्यांनी टेम्पोमधून पाटील यांना खाली उतरवले. चेतन गायकवाडने चाकूचा धाक दाखवत पाटील यांच्याजवळचे 14 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि येरोळ गावात जाणाऱ्या रस्त्यावर कारचा दरवाजा उघडून पाटील यांना रस्त्यावर ढकलून दिले. राजू शर्मा व महादेव जाधव यांनी पाटील यांटी आयशर टेम्पो पळवली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

























































