
रविवारचा दिवस घातवार ठरला असून राज्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिह्यात ट्रक आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला असून सांगली जिह्यात चालकाचे निंयत्रण सुटल्याने कार विहिरीत पडून पाच जण ठार झाले आहेत. हे दोन्ही अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडले आहे.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रविवारी मध्यरात्री ट्रक आणि क्रुझर यांच्यात अपघात झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. चोपडा येथून परतत असताना क्रुझला ट्रकची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगला चौधरी यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला. तर सातारा जिह्यातील चितळी येथील सहा जण नातेकाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला निघाले होते. पारेकरवाडी येथून सातारा जिह्यातील चितळी येथे गाडीने जात असताना गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये जाऊन पडली. विहीर पाण्याने भरलेली असल्याने गाडीत असलेल्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही आणि त्यात गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. तर हरिबा वाघमोरे हे गाडीची काच फोडून बाहेर आल्याने बचावले आहेत. या अपघातात मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40), शोभा पाटील (38) यांचा मृत्यू झाला आहे.






























































