
जामिया विद्यापीठाबाहेर रविवारी रात्री दोघा अज्ञातांनी गोळीबार केल्याने परिसरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले. गेल्या चार दिवसांत गोळीबाराची तिसरी घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.
जामिया आणि शाहीनबागमध्ये लागोपाठ घडलेल्या गोळीबाराच्या घटनांची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने रविवारी पोलीस उपायुक्तांची तडकाफडकी बदली केली. त्या कारवाईला काही तास उलटत नाहीत तोच रात्री साडेअकराच्या सुमारास जामिया विद्यापीठाच्या 5 नंबर गेटजवळ स्कुटीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. याच परिसरात दीड महिन्यापासून ‘सीएए’विरोधी आंदोलन सुरू आहे. या आधी 30 जानेवारीला एका हल्लेखोराने ‘सीएए’विरोधातील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर गोळीबार केला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारीला शाहीनबागमध्ये एका तरुणाने हवेत गोळ्या झाडल्या होत्या.


























































