मलबार हिल येथे इमारतीला भीषण आग, अठरा जणांची सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-pic

मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला बुधवारी रात्री 7.56 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आगीचा भडका उडाल्याने एकच घबराट पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू करून अठरा जणांची सुखरूप सुटका केली.

मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कच्या बाजूला असलेल्या उच्चभ्रू भागात लॅपपालमास ही 15 मजली रहिवासी इमारत आहे. रात्री 7.56 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाचव्या मजल्यावर लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, इमारतीची अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याची माहिती आहे.