वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय लेख, वत्तृत्व स्पर्धा; प्रभादेवीत 10 ते 12 फेब्रुवारीला आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसोबत लेखस्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धासुद्धा सर्वांसाठी खुली असून ‘असा हवा…नवा महाराष्ट्र!’ या विषयावर महाराष्ट्राबद्दलच्या आपल्या कल्पना किमान 2500 शब्दांत लिहून आपल्या व्यक्तिगत माहितीसह 15 फेब्रुवारी 2020 पूर्वी [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाद्वारे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गतवर्षी शिवसेनेच्या वतीने राज्यभरात वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून मराठवाडा, पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे यंदाही मिळत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार याही वर्षी सोमवार 10 फेब्रुवारी ते बुधवार 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. मराठवाडा, पूर्व व पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतील इच्छुक स्पर्धकांची स्पर्धा एकाच ठिकाणी मुंबई येथे संपन्न होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला एकूण आठ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व स्पर्धकांना शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात येणार असून अंतिम विजयी होणाऱया स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व भरघोस रोख रकमेच्या पारितोषिकांनी सन्मानित केले जाणार आहे.

स्पर्धेच्या नियम आणि अटी पुढीलप्रमाणे –
– दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर स्पर्धकांना बोलता येईल.
– प्रत्येक स्पर्धकाला बोलण्यासाठी 6 अधिक 2 असा 8 मिनिटांचा कालावधी असेल,
– परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
– स्पर्धेकरिता एकच खुला गट आहे.
– स्पर्धा ठरविलेल्या दिवशी ठीक सकाळी 10 वाजता सुरू होईल.
– स्पर्धकांनी वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
– स्पर्धा पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे संपन्न होणार असून नाव नोंदविलेल्या स्पर्धकांनी उपस्थित राहावे.