राममंदिर ट्रस्ट वादात, साधुसंतांनी फडकवले बंडाचे निशाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घोषणा केलेल्या श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टवरून वादाला तोंड फुटले आहे. ट्रस्टच्या अध्यक्षपदी रामलल्ला पक्षाचे वरिष्ठ वकील केशवन अय्यंगार पराशरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर अयोध्येतील साधु-संतांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ट्रस्टमध्ये जुन्याजाणत्या लोकांना स्थान देण्यात आले नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

ट्रस्टमध्ये जुन्याजाणत्या लोकांवर अन्याय झाला असून याबाबत आम्ही आवाज उठवणार आहोत, अशी भूमिका साधुसंतांनी गुरुवारी मांडली. सरकारने संतांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः मंदिर ट्रस्टमध्ये नृत्यगोपाल दास यांना सहभागी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांना ट्रस्टमध्ये घेतले नाही, असा आरोप दिगंबर आखाडय़ाचे महंत सुरेश दास यांनी केली.

याबाबत त्यांनी गुरुवारी सायंकाळी तातडीची बैठक बोलावली होती. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आश्वासनानंतर ही बैठक रद्द करण्यात आली. ट्रस्टच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपाल दास, तर सचिवपदी चंपत राय यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन गृहमंत्री शहा यांनी दिले, असा दावा महंत नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी केला आहे.

जागेच्या मुद्दय़ावरून मुस्लिम नाराज
उत्तर प्रदेश सरकारने जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 18 किलोमीटर दूर अंतरावर सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देऊ केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयावर मुस्लिम पक्षकार नाराज झाले आहे. आपल्याला दूर अंतरावर जमीन दिल्याचे म्हणणे मुस्लिम पक्षकारांनी मांडले आहे.