‘एसआरए’, ‘एमएमआरडीए’कडे पालिकेचे 1720 कोटी थकीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यातून पालिकेला मोठा महसूल मिळतो, मात्र ‘एसआरए’ने आतापर्यंत राबवलेल्या काही प्रकल्पांचे 1600 कोटी, तर ‘एमएमआरडीए’ने 120 कोटी थकवले आहेत. ही थकबाकी वसूल करणे महसूल वाढीसाठी आवश्यक असून पालिकेने ती तातडीने वसूल करावी, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली.

मुंबई महानगरपालिकेला विविध प्रकारच्या करांसह मालमत्ता कर, मुदत ठेवी आणि सेवाशुल्कातून महसूल मिळतो. मालमत्ता कराची 15 हजार कोटींची रक्कमही थकीत आहे. ती वसूल करण्यासाठी पालिकेने आता ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. पालिकेच्या भूखंडांवर राबवण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांच्या माध्यमांतूनही पालिकेला महसूल मिळत असतो. असे काही प्रकल्प एसआरए आणि एमएमआरडीएने राबवले आहेत, मात्र या प्रकल्पांची कोटय़वधींची रक्कम पालिकेला दिलेली नाही, असे सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी सांगितले.

जमीन अधिमूल्य, पायाभूत सुविधांची रक्कम थकवली

‘एसआरए’कडून जमीन अधिमूल्य 618 कोटी तर पायाभूत सुविधा, एमआरटीपी विकास शुल्कापोटी 982 कोटी येणे आहे, तर एमएमआरडीएकडून 120 कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा शुल्क येणे आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना देण्यात आली आहे. त्यांनी याबाबतची माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, तसेच पालिकेने याबाबत पत्रव्यवहार केल्यास प्रलंबित असलेली महसुलाची रक्कम प्राधान्याने दिली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती परब यांनी दिली.