
मालवणमधील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने बसवण्यात आलेले ‘ओपन जिम’ साहित्य लोकार्पणापुर्वीच तुटून गेले आहे. तुटलेल्या साहित्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. तरी दर्जेदार पध्दतीने साहित्य उभारणी पूर्ण होईपर्यंत जिमचा वापर कोणी करू नये. योग्य पद्धतीने जिमचे साहित्य बसवल्यानंतर जिमचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नगरसेवक नितीन वाळके, आकांक्षा शिरपुटे, संमेश परब, नरेश हुले, पालिका अधिकारी हळदणकर, केरीपाळे, कोकरे, खरात व नागरिक यांच्या उपस्थितीत ‘ओपन जिम’ची पाहणी केली. तुटलेल्या साहित्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे देण्यात आली. निकृष्ट साहित्याबाबत ठेकेदार एजन्सीला खडेबोल सुनावत दर्जेदार पद्धतीने नव्याने साहित्य उभारणी करा, अशा सूचना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिम उभारली. त्याचे लोकार्पणही झाले नाही. अशा स्थितीत जिमचा वापर सुरू झाला आणि निकृष्ट कामामुळे साहित्य तुटले. मात्र जिल्हा प्रशासनाच्या या कामाचे राजकारण करून विरोधक पालिकेवर नाहक आरोप करत आहेत. प्रसिद्धीसाठी केवळ पेपरबाजीत धन्यता मानणाऱ्या विरोधकांनी आपल्या सूचना नगराध्यक्ष या नात्याने आपल्याला सांगाव्यात, त्या सोडवण्यास आपण तयार असल्याचे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाकडून हे साहित्य मंजूर झाले. त्यांच्यावतीने ठेकेदार एजन्सी नेमण्यात आली. काही महिन्यांपूर्वी जिम साहित्य मालवण पालिकेस मिळाले. मात्र, गेल्यावर्षी लांबलेला पावसाळी हंगाम विचारात घेता निश्चित करून दिलेल्या जागी साहित्य उभारणी करण्यास काहीसा विलंब झाला. काही दिवसांपूर्वी टोपीवाला बोर्डिंग मैदानावर प्रवेशद्वाराच्या बाजूला ओपन जिम साहित्य बसवण्यात आले. जिमचे काही साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. मातीत साहित्य बसवताना घाई गडबडीत बसवण्यात आले. त्यामुळे काही साहित्य जमिनीतून उखडले तर काही साहित्य तुटून गेले. साहित्याचे नटबोल्डही सुटून पडत आहेत. या सर्व बाबी ठेकेदार एजन्सीच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. तर मुख्य ठेकेदाराला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दूरध्वनीवरून कडक शब्दात समज दिली आहे. ओपन जिमच्या ठिकाणी जमिनीची लेव्हल करून त्यावर लॉन पसरवले जाणार आहे. तर मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बैठक व्यवस्था केली जाणार आहे. तसेच गेट व प्रवेशद्वारही उभारणी होईल, अशी माहितीही नगराध्यक्षांनी दिली.































































