
अलिबागचा पांढरा कांदा हा प्रसिद्ध असून यामध्ये असलेल्या गुणामुळे चविष्ट लागतो. अलिबागमधील सफेद कांद्याला प्रचंड मागणी असून अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत एक माळेला भाव मिळत आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने पांढरा कांद्यावर बुरशीजन्य रोग आल्याने यावेळी शेतकऱ्यांना उत्पन्न कमी मिळणार आहे. तसेच यावर्षी लागवडीचे प्रमाणही कमी झाले आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुका हा पांढरा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. अलिबागच्या या पांढरा कांद्यात उत्तम जीवनसत्व असल्याने या कांद्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. अलिबागमध्ये अडीचशे हेक्टरवर दरवर्षी पांढरा कांद्याची लागवड केली जाते. मात्र यावेळी अतिवृष्टी झाल्याने पांढरा कांदा लावणारी जमीन ही ओलिताखाली त्यामुळे यावर्षी 232 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली. तर 18 हेक्टर लागवडीचे क्षेत्र हे रिकामे राहिले आहे.
भातशेती कापणी झाल्यानंतर अलिबागमधील शेतकरी हे पांढरा कांद्याची लागवड करतात. मात्र यावेळी अवेळी पावसाने शेतातील जमिनीतील पाणी तसेच राहिल्याने कांद्याच्या रोपट्याचा मुळांना बुरशी पकडली गेली. रोपटे काढून दुसऱ्या ठिकाणी लावले गेले तरी बुरशीमुळे रोपटे हे सुकले गेले. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान तयार होणारा पांढरा कांदा अद्यापही बाजारात आलेला नाही. तर आधी लावलेला पांढरा कांदा हा तयार झाला असून काढण्याची वेळ आलेली आहे. मात्र अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे सफेद कांद्याच्या उत्पन्नात घट होणार आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. हे मात्र नक्की.
यावर्षी अतिवृष्टीने पांढरा कांदा लागवड जमीन ही ओली असल्याने कांद्याच्या रोपट्याला बुरशी रोग आला आहे. त्यामुळे यावेळी पांढरा कांदा लागवड क्षेत्र कमी झाले आहे. यावर्षी कांद्याचे उत्पन्नही कमी झाले आहे. पांढऱ्या कांद्यावर आलेल्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प आणि कार्बनडिझम फवारणी करण्याचे मार्गदर्शन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना केले आहे. – बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी
























































