Exit poll – दिल्लीकरांची आपलाच पसंती, भाजपची निराशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली विधानसभा निवडणूकीचे मतदान संपल्यानंतर काही वेळातच सर्व एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. सर्व एक्झिट पोलचे अंदाज पाहता दिल्लीकरांनी पुन्हा आपलाच पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचेच सरकार येईल असे अंदाज एक्झिट पोलने वर्तवले आहेत.

एबीपी नेल्सनच्या एक्झिट पोलनुसार दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टीला म्हणजेच आपला 50 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपाला 5 ते 19 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागेल असे या पोलमधून समोर येत आहे. न्य़ूजएक्स-पोलस्टार्ट च्या एक्झिट पोलनुसार आपला 56 जागा तर भाजपला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिकन व जन की बातने सादर केलेल्या अंदाजांनुसार आपला 48 ते 61 जागा तर भाजपला 9 ते 21 जागा मिळू शकतात. काँग्रेस पुन्हा एकदा इथेही एका जागेवर अडली आहे. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार आपला 44 तर भाजपला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक ही भाजप व आप या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरली आहे. दिल्ली विधानसभेच्या  प्रचारासाठी भाजपचे देशभऱातील दिग्गज नेते दिल्लीत तळ ठोकून बसले होते. त्यात केजरीवाल यांनीही झंझावाती प्रचार करत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते.