नोकरीचे आमिष दाखवून कॉन्स्टेबलने तरुणाला फसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेत चालकाची नोकरी तसेच विकलांग बहिणीला स्टॉल मिळवून देतो अशी बतावणी करीत एका तरुणाला कॉन्स्टेबलनेच 1 लाख 30 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली आहे.

महादेव तुपे असे त्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. अमोल ढेरे (36) या तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून तुपे याला अटक केली आहे. एका कॉमन मित्राच्या ओळखीतून तुपे आणि ढेरे यांची ओळख झाली होती. त्यावेळी तुपे आणि त्याचा मित्र राजू गावडे या दोघांनी ढेरेला विश्वासात घेऊन त्याला त्याचा प्रॉपर्टीचा वाद मिटवून देऊ असे सांगितले. तसेच पालिकेत चालकाची नोकरी मिळवून देऊ असेदेखील सांगितले. तेव्हा सशस्त्र पोलीस विभागात कार्यरत असणारा तुपे मंत्रालय येथे तैनात होता. त्यामुळे तुपे त्याच्या ओळखीने आपल्याला नोकरी मिळवून देईल असे ढेरेला वाटले. त्यामुळे त्याने 1 लाख 30 हजार तुपेला दिले, पण पैसे मिळताच तुपे आणि गावडे पळून गेले. दोघांनी ढेरेला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे ढेरे याने एमएचबी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर ढेरेचे पैसे परत करीन असे तुपे म्हणाला, पण त्याने तसे केले नाही. परिणामी ढेरेने पोलीस आयुक्तांना भेटून आपली कैफियत सांगितल्यानंतर एमएचबी पोलिसांनी महादेव तुपे याला अटक केली.