
नाशिकजवळील आर्टिलरी सेंटर येथे शनिवारी दीक्षान्त संचलन सोहळय़ात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना गौरविण्यात आले.
नाशिकरोड येथील तोफखाना केंद्रात तब्बल 42 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 333 गनर्सचा दीक्षान्त संचलन सोहळा शनिवार पार पडला. यावेळी या नवसैनिकांना देशसेवेची शपथ देण्यात आली. प्रथिक के. एस. यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी हा किताब पटकावला.
नाशिकजवळील आर्टिलरी सेंटर हे नवसैनिकांना प्रशिक्षण देणारे देशातील सर्वात मोठे केंद्र आहे. येथे 42 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 333 गनर्सचा आज शानदार दीक्षान्त संचलन सोहळा झाला. त्यांचे सशस्त्र संचलन डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
आर्टिलरी स्कूलचे मेजर जनरल पी. रमेश यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी नवसैनिकांना मार्गदर्शन केले. आपण तोफखाना केंद्राच्या नावलौकीकात भर घालावी, आपली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडावी, हिंदुस्थानी सैन्यदलाच्या गौरवशाली परंपरेचे जतन करावे, असे आवाहन केले.
गनर्सच्या पालकांनीही या सोहळय़ाला आवर्जून हजेरी लावून त्यांचे कौतुक केले. विविध विषयांतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात प्रथिक के. एस., अमोल वानखेडे, अजित कुमार, दीपक यादव, ऋषभ दुबे, यांचा समावेश आहे. या सोहळ्याच्या समारोपानंतर गनर्सच्या पालकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवपदक प्रदान करण्यात आले.



























































