
खाकी वर्दीचा रुबाब काही औरच असतो. मात्र काही पोलीस नेमके त्याचा गैरफायदा घेतात. विशेषतः वाहतुकीचे नियम मोडल्यावर आयकार्ड दाखवून किंवा हात दाखवून कारवाईतून पळवाट काढताना आतापर्यंत अनेक पोलिसांना आपण पाहिले असेल, पण आता अशा पोलिसांवरही ई चलनामुळे जरब बसल्याचे ठाण्यात आढळून आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या 40 हून अधिक पोलिसांच्या घरी ई चलन धाडून कारवाई करण्यात आली आहे.
- ठाणे नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक बाराते यांच्या पथकाद्वारे केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे 40 हून अधिक पोलीस कचाट्यात सापडले आहेत.
- विनाहेल्मेट वाहने चालवणाऱ्या पोलिसांची संख्या यामध्ये जास्त आहे. गृहरक्षक दलाचे जवान, पोलीस शिपाई आणि काही उच्चपदस्थ पोलिसांचाही या कारवाईत समावेश आहे.
शिस्त म्हणजे शिस्त!
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्वतःपासूनच वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय ठेवली पाहिजे. त्यामुळे ठाणे नगर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी सांगितले.
























































