पडघा टोलनाक्याच्या मुजोर कर्मचाऱ्यांनी मुंबई-नाशिक महामार्ग दोन तास रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधीच वादात असलेल्या पडघा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचा फटका आज पुन्हा एकदा वाहनचालकांना सहन करावा लागला. विकेण्डमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्याने त्यात अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने झालेल्या गोंधळामुळे हा मार्ग तब्बल दोन तास रोखला गेला. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूककोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

शनिवार, रविवार सलग दोन दिवस साप्ताहिक सुट्टी आल्याने मुंबई, ठाण्यातून शेकडो साईभक्त शिर्डीच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर आधीच वाहनांची वर्दळ वाढून ठिकठिकाणी कोंडीचा सामना करावा लागत होता. या वाहतूककोंडीमध्ये एक रुग्णवाहिकाही अडकली होती. तिला वाट मोकळी करून देण्यासाठी शिर्डीला निघालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी बाळासाहेब निंबाळकर यांनी प्रयत्न केला. वाहतूक लवकर खुली करा, अशी विनंती त्यांनी पडघा टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना केली असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाहनचालकांनीच खाली उतरून वाहतूक मोकळी करून द्यावी, असे उलट उत्तर त्याने दिले. तसेच निंबाळकर यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे टोलनाक्यावर तणाव निर्माण झाला.

कारवाईची मागणी

सलग दोन दिवस सुट्टी असल्याने मुंबई परिसरातील पर्यटक शिर्डी- नाशिकच्या दिशेने निघाले असताना पडघा येथील टोलनाक्यावर कोणतीच व्यवस्था, नियोजन केले नसल्याचे यावेळी समोर आले.त्यात कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.