अवैध सावकारीप्रकरणी रेणापूरमध्ये पती-पत्नीविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमधील रेणापूर तालूक्यातील मौजे सेलू खुर्द येथील पती-पत्नीवर अवैध सावकारी केल्याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील बाळासाहेब राम आडतराव यांनी रेणापूर तालूक्यातील सेलू खुर्द येथील भागवत नारायण बोंबडे व त्यांची पत्नी मिनाबाई भागवत बोंबडे यांच्याविरोधात खाजगी सावकारीच्या पाशातून मुक्त करावे असा तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे दिला होता.

या तक्रारीनुसार भागवत बोंबडे यांच्या घराची 6 फेब्रुवारी रोजी झडती घेण्यात आली. या झडतीत सापडलेला दस्तावेज, डायऱ्यांचा पंचनामा करण्यात आला. त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. भागवत बोंबडे, त्यांची पत्नी मिनाबाई बोंबडे व मुलगा निलेश बोंबडे यांच्या नावे खरेदी केलेली शेतजमीन, दुकान, गाळे या नोंदीत आढळून आले. तसेच ते अवैध सावकारी करत असल्याचेही दिसून आहे आले. त्यांच्या घरात तब्बल 29 खरेदी खत आढळून आले. तसेच त्यांच्या डायऱ्यांमध्ये अनेकांच्या नावाने दिलेल्या रक्कमाही दिसून आल्या आहेत. अवैध सावकारी केल्यामुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.