कराड व वाळवा तालुक्यातील पूरबाधित शेतकर्‍यांना कृष्णा कारखान्याचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराडमधील कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे यंदाच्या गळीत हंगामासाठी नोंद झालेल्या पूरग्रस्त क्षेत्रातील 634.70 हेक्टर ऊसाच्या तोडणीसाठी कारखान्याने प्राधान्याने यंत्रणा पुरविली आहे. कारखान्याने आतापर्यंत 570.12 हेक्टर क्षेत्रातील ऊसाची तोड केली असून उर्वरित 64.56 हेक्टर क्षेत्रातील तोडदेखील महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार कारखाना प्रशासनाने केला आहे. कराड व वाळवा तालुक्यात कृष्णा कारखान्याने पूरग्रस्त क्षेत्रातील सर्वाधिक ऊसतोड करून पूरबाधित शेतकर्‍यांना आधार दिला आहे.

गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे कराड आणि वाळवा तालुक्यात मोठे नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यातील शेतीचे, विशेषत: ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पूरबाधित असणार्‍या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, शेणोली, कार्वे, टेंभू, सदाशिवगड, घारेवाडी, आटके, वाठार, बेलवडे बुद्रुक आणि वाळवा तालुक्यातील तांबवे, बहे, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, बिचुद, येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर या गावांतून एकूण 634.70 हेक्टर क्षेत्रातील नोंद कारखान्याकडे झाली आहे. या सर्व गावातील ऊसशेतीला पूरस्थितीचा फटका बसल्याने ऊसांना कोंब फुटणे, मुळे सुटणे, ऊस पोकळ होणे असे परिणाम झाले. त्यामुळे ऊसाचे वजन कमी झाले आणि उतार्‍यावरही परिणाम झाला. पुराचा फटका बसलेल्या या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी या भागातील ऊसाला तातडीने तोड देण्याची भूमिका डॉ. सुरेश भोसले यांनी घेतली. त्यानुसार प्रशासनाने 634.70 हेक्टरवरील पूरग्रस्त क्षेत्रापैकी 570.12 हेक्टरवरील ऊसाची तोड युद्धपातळीवर केली असून उर्वरित 64.56 हेक्टर क्षेत्रावरील तोड येत्या महिनाअखेरपर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. कृष्णा कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे पूरबाधित शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.