खालापूरच्या टोलनाक्यावर ट्रॅफिक कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोलनाक्यांवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी फास्ट टॅगचा पर्याय आणण्यात आला. मात्र ठेकेदाराचा गोंधळी कारभार आणि फास्ट टॅगचा उडालेला बोजवारा यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रोजच वाहनांच्या तीन-तीन कि.मी. रांगा लागत आहेत. या महामार्गावरील खालापूर टोलनाक्यावर तर नेहमीच वाहतुकीचा विचका उडत आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबई-पुणे प्रवास जलदगतीने व्हावा आणि प्रवाशांचा वेळ आणि पैशांची बचत व्हावी म्हणून द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला. यानुसार महामार्गाने प्रवाशांना दिलासादेखील मिळाला. पण मुंबई किंवा पुण्याहून जलद निघालेली वाहने येथील टोलनाक्यांवर वीस-वीस मिनिटे लटकतात. खालापूर टोलनाक्यावर तर दर शनिवारी, रविवारी तोबा गर्दी असते. फास्ट टॅगसाठी असलेली यंत्रे चलाखीने प्रत्येक गाडीजवळ जाऊन स्कॅन करणे गरजेचे असताना येथील कर्मचारी जागेवरच उभे राहतात. त्यामुळे बराचसा वेळ जाऊन मागे गाड्यांच्या रांगा लागतात. त्यामुळे फास्ट टॅग काढूनही वाहनचालकांना ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे लटकावे लागते.

नियम धाब्यावर.. पिवळीपट्टी कागदावरच

फास्ट टॅग प्रणालीचा वापर अद्यापही अनेक वाहनचालकांनी वापरण्यास सुरुवात केली नाही. त्यामुळे ज्यांनी हा टॅग काढला आहे त्याकरिता टोलनाक्यावर वेगळी रांग असते. मात्र तेथेही ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे राखीव असलेल्या रांगेत फास्ट टॅग नसलेली वाहने घुसतात. त्यातच दोनशे मीटरवर मारलेल्या पिवळ्यापट्ट्यांबाहेर वाहने जाऊनदेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. नियम धाब्यावर बसवून ठेकेदार काम करत असल्याने खालापूर टोलनाक्यावर नेहमीच वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.