
कराड येथील आगाशिव डोंगर पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यानंतर येथे वनविभागाने वृक्षारोपण करून वनसंपदा वाढवली आहे. त्याला सामाजिक संस्था, संघटना व वन्यप्रेमींचे चांगले सहकार्य मिळले आहे. त्यामुळे डोंगर हिरवा दिसू लागला आहे. मात्र, समाजकंटकांकडून लावले जाणार्या वणव्यांमुळे मोठ्या कष्टाने जपलेली व वाढवलेली वनसंपदा नष्ट होण्याबरोबरच पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे वनवे रोखण्यासाठी वनविभाग कठोर पावले उचलत आहे. डोंगरांना किंवा वन विभागाच्या हद्दीतील क्षेत्राला वणवा लागूच नये म्हणून वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबावण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे.
आगाशिव डोंगरासह वनविभागाच्या ताब्यात असलेल्या वनक्षेत्राचे वणव्यांपासून रक्षण करण्यासाठी वनविभागाची धडपड सुरु आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. प्राथमिक उपाययोजना म्हणून जाळपट्टा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार काही दिवसांपुर्वी आगाशिव डोंगरावर जाळपट्टा तयार करण्यात आला. वनसंपदा जपण्यासाठी कराड परिक्षेत्राचे वन अधिकारी व्ही. आर. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.
आगाशिव डोंगर परिसर महाराष्ट्र शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केला आहे. या पर्यटनस्थळ विकासासाठी शासनाने सुमारे 45 कोटीचा विकास आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात पाच कोटी निधी वर्ग झाला यातून डोंगराला कुंपण, वनतळी, बंधारे व वृक्षारोपण अशी कामे करण्यात आली आहेत. वनविभागाकडून टँकरने पाणीपुरवठा करून हजारो झाडे वाढवली जात आहेत. वनविभागाबरोबरच गेली अनेक वर्षांपासून मळाईदेवी शिक्षणसंस्था व जखिणवाडी ग्रामपंचायतीने आगाशिव डोंगर परिसरात वृक्षारोपण व बिजारोपण करून या परिसराला वेगळे रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. वनविभाग व स्वयंसेवी संस्था वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करत असताना काही समाजकंटक याला गालबोट लावत आहेत.
झपाट्याने पर्यटनस्थळ विकसीत होत असताना गेली दोन वर्षात या परिसरात ठिकठिकाणी समाजकंटकांकडून रात्रीच्यावेळी वणवे पेटवले जात आहेत. एका बाजूला पर्यावरण संवर्धनासाठी अनेक पर्याय करीत असताना येथील आगाशिव डोंगर परिसरात रात्रीच्यावेळी वणवे पेटत असल्याने आगाशिव पर्यटनस्थळाला प्रत्येकवर्षी समाजकंटकांचे ग्रहण लागते आहे. गेल्यावर्षी चचेगांव बाजूला आगाशिव डोंगरात लागलेल्या आगीत कष्टाने वाढवलेल्या झाडांसह लाखोची वनसंपदा जळून खाक झाली होती. यावर अंकुश ठेवण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजनाची अमंलबजावनी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचा प्राथमिक टप्पा म्हणून आगाशिव डोंगरासह वन परिसराचे वणव्यांपासून रक्षण करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत.


























































