आसामची NRC यादी वेबसाईटवरून गायब? गृहमंत्रालयाने दिलं उत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

नागरिकत्व सुधारित कायदा आणि नॅशनल रजिस्टर फॉर सिटिजन (NRC)च्या मुद्द्यावर देशभरात समर्थन आणि विरोधात मोर्चे, आंदोलनं सुरू आहेत. या दरम्यान आसाम एनआरसीच्या डेटा संदर्भात वाद सुरू झाला आहे. आसाममध्ये गेल्यावर्षी NRC ची प्रक्रिया सुरू झाली होती. त्याचा सारा डेटा अधिकृत वेबसाइटवरून गायब झाला आहे. ज्यानंतर अनेक प्रश्न विचारण्यात येत होते. आता गृह मंत्रालयाने यावर उत्तर दिले आहे. ‘संबंधित डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत ज्यामुळे हा डेटा वेबसाईटवर दिसत नाही’, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

nrc-site-error1

काही दिवसांपूर्वी आसाम एनआरसीचा डेटा गृह मंत्रालयाद्वारे http://www.nrcassam.nic.in वर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण यादी होती. मात्र अचानक इथून हा डेटा हटवण्यात आला आणि वेबसाइट देखील सुरू होत नव्हती. यानंतर नानातऱ्हेच्या अफवा पसरू लागल्या आणि गृह मंत्रालयाला प्रश्नांचा भडिमार झाला.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आता मात्र या साऱ्या अफवा असून सारे गैरसमज दूर केले आहेत. वेबसाईटवर क्लाउडच्या कारणास्तव वेबसाईटवर डेता दिसू शकत नाही. तसेच बिघाड लवकरच दुरुस्त करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

एनआरसीचे राज्य कॉर्डिनेटर (समन्वयक) हितेश देव शर्मा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सध्या डेटा ऑफ लाइन करण्यात आला आहे, परंतु ही गडबड तांत्रिक कारणाने झाली आहे. तसेच त्यांनी सांगितले की, वेबसाईटच्या क्लाउड सर्व्हिसची जबाबदारी आयटी फर्म विप्रोकडे देण्यात आली होती. जी ऑक्टोबर 2019 पर्यंत उपलब्ध होती.

nrc-site-errorहितेश देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील कॉर्डिनेटरने यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी विप्रो कंपनीने ही सुविधा बंद केली. दरम्यान, आता राज्य समन्वय समितीने यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो कंपनी यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात वेबसाईटवर सर्व डेटा पहिल्याप्रमाणेच झळकेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आसाममध्ये गेल्या वर्षी NRC ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ज्यामध्ये 19 लाख लोक अनधिकृत ठरले होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारकडून NRC ची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये आसाममधील एकूण 3,30,27,661 लोकांपैकी 3,11,21004 नागरिकांची नावे आली होती. तर 19,06,657 लोक NRC च्या यादीतून बाहेर झाले होते.