दोषींचा वेळकाढूपणा न्यायालयाला दिसत नाही का ? न्यायासाठी लढणाऱ्या निर्भयाच्या आईचा हताश प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirbhaya mother

निर्भया गँगरेप प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला न्यायव्यवस्थेकडून उशीर होत असल्यामुळे निर्भयाची आई आशा देवी हताश झाल्या असून बुधवारी न्यायालयाच्या बाहेरच त्यांना रडू कोसळले. त्यांनी रडतच पत्रकारांसमोर ‘दोषींचा वेळकाढूपणा न्यायालयाला दिसत नाही का? असा सवाल केला आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्भयाच्या दोषींच्या फाशीवर स्थगिती आणली आहे. त्याविरोधात निर्भयाच्या आईने पतियाळा न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली. दरम्यान दोषी पवनने वकील बदलण्याची मागणी न्यायालयात केली असून न्याय़ालयाने त्याची ही मागणी मान्य केली आहे. त्याची ही मागणी ऐकून निर्भयाची आई हताश झाली व त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ‘माझा विश्वास आणि आशा आता मावळत चालली आहे. न्यायालयाला दोषींचा वेळकाढूपणा दिसत नाही का? आता जर एखाद्या दोषीला नवा वकील दिला तर त्या नव्या वकिलाला हा खटला समजण्यासाठी किती वेळ जाईल’, असे त्यांनी हताश होत सांगितले.

मी गेली सात वर्ष माझ्या लेकीला न्याय मिळावा म्हणून इथे तिथे भटकत आहे. हे दोषी वेगवेगळ्या पळवाटा शोधत आहेत. मला सजत नाही की न्यायालयाला हे कळत का नाहीए. माझ्या हक्कांचं का. मी देखील माणूसच आहे. आता या गोष्टीला सात वर्ष होऊन गेली आहेत. कृपया डेथ वॉरंट काढा’, अशी विनंती निर्भयाच्या आईने केली आहे.