
कारवाई करून आणलेला वाळूचा ट्रॅक्टर सोडण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच घेताना राहुरी तालुक्यातील तलाठ्याला शुक्रवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्यावर राहूरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम सूर्यवंशी (46) असे तालाठ्याचे नाव आहे. राहुरी तालुक्यातील सजा लाख येथे तो कार्यरत आहे.
तक्रारदार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना तलाठी सूर्यवंशी यांनी पकडले होते. 2 ऑगस्ट 2019 रोजी ही कारवाई करून राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये ते ठेवण्यात आले होते. ते ट्रॅक्टर सोडवून घेण्यासाठी आरोपी तलाठी सूर्यवंशी यांनी चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले होते. संबंधित तक्रारदाराने त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार शुक्रवारी प्रवरा नदीच्या किनारी एका शिवारामध्ये सापळा रचून आरोपी सूर्यवंशी यांना वीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक श्याम पवार, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, तन्वीर शेख, हारून शेख, अशोक रक्ताटे, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गगुल ,रवींद्र निमसे ,वैभव पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
























































