
अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात शुक्रवारी सकाळपासूनच सळसळती तरुणाई खेळांच्या मैदानात अवतरली होती. निमित्त होते युवासेनेने आयोजिलेल्या तिसऱया युवा खेळ समिटचे. यंदा या समिटमध्ये 14 क्रीडा प्रकारांत मुंबई आणि ठाण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करता येणार आहे. मुंबई-ठाण्यातील 100 महाविद्यालयांच्या सहा हजारांवर विद्यार्थ्यांनी या समिटमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भरगच्च कार्यक्रमांतून वेळ काढून या समिटला भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सहभागी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसत होता.
याप्रसंगी शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर व राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांच्या हस्ते या खेळ समिटचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी खेळ समिटला भेट देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी प्रत्येक खेळाच्या ठिकाणी जात महाविद्यालयीन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, सुनील शिंदे, माजी मंत्री सचिन अहिर, श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना सचिव आदेश बांदेकर, सूरज चव्हाण आणि उपनेत्या मीना कांबळी हे मान्यवरही होते. युवा सेना कार्यकारिणी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामुळे युवा खेळ समिटचे हे पर्व यशस्वी होत आहे.
14 खेळांत देशी-विदेशी खेळांचा समावेश
युवासेना फाऊंडेशनने आयोजित केलेल्या यंदाच्या युवा खेळ समिटमध्ये बॉक्स क्रिकेट, रिंक फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी , टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, मुष्टियुद्ध, शरीरसौष्ठव, ऍथलेटिक्स, रस्सीखेच आणि मिश्र मार्शल आर्टस् या देशी-विदेशी आणि मैदानी व बैठय़ा खेळांचा समावेश करण्यात आला आहे. शहाजीराजे क्रीडा संकुलातील शानदार व्यवस्थेमुळे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चालणारे हे खेळ समिट महाविद्यालयीन युवा खेळाडूंसाठी आगळी पर्वणीच ठरली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान
युवा खेळ समिटच्या माध्यमातून युवा खेळाडूंना सहकार्य करणारे दिल्ली दरबारचे जाफरभाई, इरफान, समिट यशस्वी करण्यासाठी झटणारे युवासेनेचे रूपेश कदम आणि देशद्रोही व्हिडीओ सोशल साइटस्वर टाकणाऱया गद्दारांना यू टय़ूबवरून जशास तसे उत्तर देऊन गप्प करणारे देशप्रेमी हिंदुस्थान भाई यांचा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शाल आणि मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.




























































