
>> नीलांबरी जोशी
स्त्रियांवर होणारे अत्याचार ही ऐतिहासिक काळापासून ‘स्त्रियांची समस्या’ मानली जाते, पण मुळात जर बलात्काराच्या घटनांमध्ये 99 टक्के बलात्कार पुरुषांनी स्त्रियांवर केलेले असतात, तर ही ‘स्त्रियांची समस्या’ कशी असू शकते असा विचारच केला जात नाही.
मी फळ्याच्या मध्यभागी एक उभी रेघ आखतो. त्याच्या एका बाजूला ‘पुरुष’ आणि दुसऱया बाजूला ‘स्त्रिया’ असं लिहितो. मग मी माझ्या त्या वर्कशॉपमध्ये समोर बसलेल्या पुरुषांना ‘‘दररोज लैंगिक अत्याचार होऊ नये यासाठी तुम्ही कोणती खबरदारी घेता?’’ हा प्रश्न विचारतो. सुरुवातीला एक विचित्र शांतता पसरते. बहुतेक सर्व पुरुष “कसला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे?’’ असा प्रश्नार्थक चेहरा करतात. एखादा तरुण मुलगा हात वर करून काहीतरी विनोदी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. त्यावर एक हास्याची हलकीशी लहर उमटते. नंतर तणावपूर्ण शांततेचे काही क्षण गेल्यावर अखेरीस एखादा हात वर करून मान्य करून टाकतो… “काही नाही. मला यावर विचारच करावा लागत नाही’’.
मग “दररोज लैंगिक अत्याचार होऊ नये यासाठी तुम्ही काय उपाय करता?’’ हाच प्रश्न मी समोरच्या स्त्रियांना विचारतो. बहुतेक सगळ्या स्त्रिया हात वर करून भराभर उत्तरं द्यायला लागतात. स्त्रिया दररोज स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय करतात ते सांगत असताना पुरुष दिङ्मूढ होऊन ऐकत असतात. शहरातल्या स्त्रियांची उत्तरं साधारणतः मी टोकदार की-चेन वापरते, लिफ्टमध्ये एकच पुरुष असेल किंवा फक्त पुरुषांचा समूह असेल तर त्यातून जात नाही, अंगभर कपडे घालते, रात्री बाहेर पडत नाही, घराकडे जाणाऱया रस्त्यावर पुरुषांचा घोळका असेल तर मार्ग बदलते, रस्त्यावरच्या पुरुषांच्या नजरेला नजर देऊन बघत नाही अशी असतात. त्यांच्या उत्तरांनी फळ्याचा ‘स्त्रिया’ असं लिहिलेला भाग भरून जातो, पण त्यांच्या उपायांची यादी थांबत नाही. जॅक्सन काटझ् या लेखकानं ‘द माचो पॅरॉडॉक्स’ या त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा अनुभव लिहिला आहे.
जगातली कोणतीही स्त्री जरी रस्त्यावर गलिच्छ नजरांना आणि भाषेला तोंड देत नसेल, जरी नवऱयाकडून किंवा घरच्यांकडून तिला मारहाण होत नसेल, जरी ती बलात्काराच्या धक्क्यातून सावरत नसेल, जरी ती बालपणी झालेल्या लैंगिक अत्याचारांमधून बाहेर पडायला समुपदेशनाची मदत घेत नसेल तरी कोणत्याही क्षणी कोणत्या तरी पुरुषाकडून आपल्यावर अत्याचार होऊ शकेल या भीतीत ती नक्की असते! हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या घटनांनी स्त्रियांना वाटणाऱया या भीतीचा आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रात हिंगणघाटमध्ये 3 फेब्रुवारीला एका तरुणीवर पेट्रोल टाकून विकेश नगराळे या तरुणानं तिला पेटवून दिलं. ती 40 टक्के भाजली आणि 10 फेब्रुवारी 2020 रोजी मृत्युमुखी पडली. महत्त्वाचं म्हणजे विकेशचं लग्न झालं आहे आणि त्याला स्वतःला सहा महिन्यांची मुलगी आहे. 2018च्या जानेवारीत जम्मू, कश्मीरमध्ये कठुआ या ठिकाणी आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. उत्तर प्रदेशात एका मुलीवर 2018 साली बलात्कार झाल्यानंतर आपल्याच खटल्याच्या सुनावणीसाठी जात असताना तिच्यावर बलात्कार करणाऱया लोकांनीच तिला 2019 मध्ये जाळलं. नोव्हेंबर 2019 मध्ये हैदराबादला 27 वर्षांच्या एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकलं.
बंद दरवाजाआड बायकोला किंवा वेश्येला मारहाण करणं, त्यांच्यावर बलात्कार करणं, स्त्राrवर सामूहिक बलात्कार करणं, बलात्कार करतानाचे व्हिडीओ काढणं, पोर्नोग्राफी पाहणं, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणं, मुलींच्या अंगावर ऍसिड टाकणं अशा सर्व अत्याचारांमध्ये पुरुषांचा वरचष्मा असतो. अशा घटना घडल्यानंतर सर्व प्रकारची माध्यमं तावातावानं या विषयावरच्या बातम्या, चर्चा, मुलाखती, परिसंवाद सादर करत असतात. या सर्व प्रकारांमध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, कायद्याची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशा प्रकारचे उपाय सुचवले जातात. हे अत्याचार करणारे पुरुष जणू परग्रहावरून आले आहेत असं त्या सगळ्या चर्चांचं स्वरूप असतं.
हे का घडतं याचं उत्तर शोधताना या लेखाच्या सुरुवातीच्या फळ्यावर केलेल्या यादीचं उदाहरण पुढे तपासून पाहू. आपल्या बाजूचा फळ्याचा भाग भरलेला पाहून अनेक स्त्रियांचा राग अनावर होतो. स्त्रियांवर होणारे अत्याचार ही आपल्या संस्कृतीमध्ये एक समस्या आहे इतपत पुरुषांना ठाऊक असतं. पण ती किती मोठी, गंभीर आणि व्यापक समस्या आहे याची मात्र त्यांना जाणीवही नसते. आपल्यावर बलात्कार होऊ शकेल या भीतीत राहणं हे सर्व देशांमधल्या सर्व स्त्रियांसाठी अपरिहार्य झालं आहे, पण पुरुषांना मात्र इतकं अज्ञान का असतं?
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार ही ऐतिहासिक काळापासून ‘स्त्रियांची समस्या’ मानली जाते, पण मुळात जर बलात्काराच्या घटनांमध्ये 99 टक्के बलात्कार पुरुषांनी स्त्रियांवर केलेले असतात, तर ही ‘स्त्रियांची समस्या’ कशी असू शकते असा विचारच केला जात नाही. त्यामुळेच स्त्रियांवर होणाऱया अत्याचारांमागची सामाजिक, सांस्कृतिक कारणं काय आहेत? मुलांना कशा प्रकारे वाढवलं जातं? त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वागणूक कशी आहे? यावर कुठेच चर्चा होताना दिसत नाहीत. आपल्या घरातला मुलगा, भाऊ, मेव्हणा, नवरा, दीर, सासरा, वडील, मित्र हे स्त्रियांशी कसे वागतात यावर थेटपणे बोललं जातं का? त्यांच्याशी याबाबत संवाद साधला जातो का? या प्रश्नांची उत्तरं नाइलाजानं ‘‘नाही’’ अशीच येतात.
जगभरातच पुरुषप्रधान संस्कृती हे बलात्कारामागचं महत्त्वाचं कारण आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम मानलं जातं. आपल्या इच्छाआकांक्षा दडपायला, अत्याचारांविरोधात मूग गिळून गप्प राहायला त्या लहानपणापासून शिकतात. परिणामस्वरूप एकूण बलात्कारांपैकी 93 टक्के बलात्कार हे नातेवाईक, मित्र, शेजारी, कामाच्या ठिकाणचे लोक वा ऑनलाइन फ्रेंडस् यांच्याकडून होतात.
हिंदुस्थानपुरतं पाहायचं झालं तर 2017 मध्ये हिंदुस्थानात बलात्काराच्या 33658 केसेस रजिस्टर झाल्या आहेत. हिंदुस्थानात दर 16 मिनिटाला एका स्त्राrवर बलात्कार होतो असं काही अहवाल सांगतात. हिंदुस्थानात बलात्कार हा अजामीनपात्र गुन्हा असला तरी अनेकदा पुराव्याअभावी आरोपी सुटून जातात. हिंदुस्थानात 2012 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर स्त्रियांवर होणारे अत्याचार नोंदवले जाण्याचं प्रमाण वाढलं, पण 2012 सालच्या प्रकरणातल्या आरोपींना अजूनही फाशी झालेली नाही. ‘नो नेशन फॉर वुमेन’ या पुस्तकात प्रियंका दुबे हिनं हिंदुस्थानात बलात्कार करणारे पुरुष कायद्याच्या कचाटय़ातून सुटण्यामागची राजकीय, सामाजिक कारणं केस स्टडीजच्या सहाय्यानं मांडली आहेत.
मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर बलात्कारी पुरुष हे ऍंटिसोशल पर्सनॅलिटीचे असतात असं दिसून येतं. बेबंद वागणं, इतरांची तमा नसणं, इतरांना फसवणं आणि त्याबद्दल लाज न वाटणं ही या व्यक्तिमत्त्वाची सर्वसाधारण लक्षणं आहेत. अनेकदा सायकोपॅथी आणि अँटिसोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर (एएसपीडी) हे दोन्ही शब्द एकाच अर्थानं वापरले जातात. सायकोपॅथी पीसीएल-आर नावाच्या चाचणीनं मोजली जाते. या चाचणीत सायकोपॅथीच्या 20 ट्रेटस्ची यादी करून प्रश्न विचारले जातात. त्याच्या उत्तरांमध्ये 30 पेक्षा जास्त गुण मिळवणारे लोक सायकोपाथ मानले जातात. सर्वसाधारण माणसाचे या चाचणीचे गुण पाच किंवा सहा असतात. वयाच्या 15व्या वर्षाच्या आधीपासून एखाद्या व्यक्तीमध्ये समाजाला घातक वागणं आणि सतत घराबाहेरच राहणं, लबाडी, खोटेपणा, चोऱयामाऱया आणि मालमत्तेची जाणीवपूर्वक नासधूस करणं अशी लक्षणं असतील तर अँटिसोशल पर्सनॅलिटी असू शकते. ही मुलं मोठेपणी बेजबाबदारपणे वागणं, कामाच्या ठिकाणी जाण्यात सातत्य नसणं, कायदे मोडणं, आक्रमक, हिंसक होणं, कर्ज चुकवणं अशा गोष्टी करतात. घरातलं दारिदय़, पालकांमधले तणाव, शिस्त लावण्याचा अतिरेक, पालकांना धूम्रपान किंवा दारूचं असलेलं व्यसन या गोष्टी ऍंटिसोशल पर्सनॅलिटी तयार होण्यात महत्त्वाच्या ठरतात. पालक, कुटुंबातले सदस्य किंवा मित्र यांचं वागणं पाहून मुलांमधली हिंसात्मक वृत्ती वाढते. तसंच भोवताली किंवा माध्यमांद्वारे हिंसात्मक घटना जास्त प्रमाणात पाहिल्या किंवा अनुभवल्या तर मुलं जास्त आक्रमक किंवा हिंसक बनतात.
महत्त्वाचं म्हणजे अशा प्रवृत्तीच्या पुरुषांना आपल्या चुकीच्या आणि घातक वर्तणुकीबद्दल पश्चात्ताप होत नाही. आपण बलात्कार करून नैराश्याच्या किंवा मृत्यूच्या दारात लोटलेल्या स्त्रियांची त्यांना तमाही नसते. पृथ्वीवरच्या निम्म्या मानवजातीला म्हणजे ‘बाईमाणसांना’ आपण कायमस्वरूपी भीतीच्या काळोखात लोटलं आहे हे पुरुषांना कधी कळणार? या प्रश्नाला
उत्तर आहे?




























































