मुलुंडमध्ये रिक्षाचालकाची तरुणीशी छेडछाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीशी लज्जास्पद हावभाव करून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मुलुंड येथे घडली. मात्र तरुणीने प्रसंगावधान दाखवत तातडीने रिक्षातून उडी मारून स्वतःची सुटका करुन घेतली.

त्यानंतर तरुणीने दिलेल्या तक्रारारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलुंडमधील संभाजीनगरात राहत असलेली 20 वर्षांची तरुणी मुलुंड कॉलनीत भावाला भेटण्यासाठी गेली होती. तेथून रात्री साडेअकराच्या सुमारास घराकडे परतण्यासाठी एका रिक्षात बसली. त्यावेळी रिक्षाचालकाने आरशातून तिच्याकडे पाहत वारंवार अश्लील हावभाव केले तसेच तिने पंचरत्न मंदिराकडे रिक्षा नेण्यास सांगितले असताना रिक्षा दुसऱयाच मार्गाकडे वळवली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने गतिरोधक आल्यानंतर रिक्षाचा वेग कमी होताच बाहेर उडी मारली. त्यामध्ये तिच्या डोक्याला दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तिला अग्रवाल रुग्णालयात नेले. दरम्यानच्या काळात रिक्षाचालक सुसाट वेगाने निघून गेला. प्रथमोपचार केल्यानंतर तिने मुलुंड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे फरार रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.