
महिलांवरील अत्याचारांविषयी राज्य शासन संवेदनशील असून याबाबत राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने आंध्र प्रदेशने केलेल्या ‘दिशा’ कायद्याची माहिती घेण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख हे 20 फेब्रुवारी रोजी हैदराबादला जाणार आहेत. या वेळी त्यांच्यासमवेत गृह राज्यमंत्री तसेच गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत.
याविषयी माहिती देताना अनिल देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे जलदगतीने चालवून या घटनांमधील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी उपाययोजना करण्यास शासन प्राधान्य देत आहे. त्यासाठी प्रभावी ठरेल असा नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहोत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जलदगतीने चालवून निकाल मिळण्यासाठी आंध्र प्रदेशने केलेला ‘दिशा’ कायदा प्रभावी ठरेल, अशी माहिती मिळत आहे. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हैदराबादला जाऊन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, गृह मंत्री तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाला भेट देऊन या कायद्याची सविस्तर माहिती घेण्यात येणार आहे.
या दौऱ्यात गृह मंत्र्यांसमवेत गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंध विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या अस्वती दोर्जे हे सोबत असणार आहेत.




























































