
दारु पिण्यासाठी 30 रुपये दिले नाहीत म्हणून हॉटेलमधील तळण्याच्या झाऱ्याने डोक्यात मारुन डोके फोडण्यात आल्याची घटना लातूरच्या रेणापूर येथे घडली. या प्रकरणी एका विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर मारहाण प्रकरणी दीपक अशोक सिरसाठ (रा. संजय नगर रेणापूर) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तो 17 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास औषध गोळ्या घेऊन येण्यासाठी मेडिकल दुकानात गेला होता. औषधे घेऊन तो चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. त्या ठिकाणी रेणापूर येथील सचिन अंकुश माने हा आला आणि त्याने दारु पिण्यासाठी 30 रुपये दे म्हणून पैशांची मागणी केली. दीपक याने माझ्याकडे पैसे नाहीत असे त्याला सांगितले असता हॉटेलमधील तळण्याच्या झाऱ्याने सचिने दीपकच्या डोक्यात मारुन त्याचे डोके फोडले.
हॉटेलमधील लोकांनी त्याला सोडवले व डोके फुटून रक्त येत असल्याने फिर्यादीला रेणापूर पोलीस ठाण्यात पाठवले. रेणापूर येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी सचिन माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































